रत्नागिरीत भगवे वादळ
By Admin | Published: February 23, 2017 11:57 PM2017-02-23T23:57:10+5:302017-02-23T23:58:27+5:30
३९ जागा शिवसेनेकडेच--राष्ट्रवादी काँग्रेस मागे---बंडखोर, अपक्षांना ठेंगा ३९ जागा शिवसेनेकडेच---राष्ट्रवादी काँग्रेस मागे---बंडखोर, अपक्षांना मतदारांचा ठेंगा---भाजपच्या पदरी भोपळाच
रत्नागिरी : नाराजी, बंडखोरी असतानाही स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेने रत्नागिरी हा अजूनही आपलाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. गतवेळी युती असतानाही मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा स्वबळावर मिळवून शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच पक्षांना जोरदार धक्का दिला. ५५पैकी तब्बल ३९ जागा जिंकून शिवसेनेने रत्नागिरी जिल्हा परिषदेवरील भगवा कायम ठेवला. गतवेळी १९ जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळी १६ जागांवर थांबावे लागले. काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा आली तर भाजपला भोपाळाही फोडता आला नाही. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांपैकी एकाचाही प्रभाव पडला नाही.
जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूक लढले. गतवेळी भाजप सोबत असताना शिवसेनेला २५ जागा मिळाल्या होत्या. यावेळी अनेक नाराजांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्याचा फटका शिवसेनेला बसणार, असे भाकीत वर्तवले जात होते. मात्र, शिवसेनेने स्वबळावर तब्बल ३९ जागा जिंकल्या आहेत. रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांमध्ये सर्वच्या सर्व जागा शिवसेनेने जिंकल्या.
गतवेळी युती असताना जिल्हा परिषदेत ८ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
गतवेळी १९ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा रथ यावेळी १६ जागांवरच थांबला. गुहागर, चिपळूण, दापोली, खेड, मंडणगड आणि राजापूर येथे राष्ट्रवादीला यश मिळाले. भास्कर जाधव आणि संजय कदम या राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी आपापल्या भागात राष्ट्रवादीला यश मिळवून दिले. गतवेळी ३ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला मात्र यावेळी जिल्हा परिषदेत केवळ राजापूर तालुक्यात एक जागा मिळाली. ५ तालुक्यांत राष्ट्रवादीशी आघाडी करूनही काँग्रेसला केवळ एकाच जागेवर यश मिळाले. (प्रतिनिधी)
पंचायत समितीतही सेनाच
नऊपैकी पाच समित्यांवर सेनेचे वर्चस्व, दोन राष्ट्रवादीला, दोन त्रिशंकू
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत जोरदार यश मिळवणाऱ्या शिवसेनेने पंचायत समितींमध्येही आपले वर्चस्व कायम ठेवले. नऊ पंचायत समितींपैकी ५ पंचायत समिती शिवसेनेने पटकाविल्या. दोन पंचायत समितींवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आणि उर्वरित दोन पंचायत समितींमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी यांना समसमान जागा मिळल्याने तेथील अवस्था त्रिशंकू झाली आहे.
पंचायत समितींच्या ११0 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने तब्बल ७३ जागा जिंकल्या. गतवेळी ११४ पंचायत समिती जागांपैकी ३८ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळी ३९ जागाच जिंकता आल्या. जिल्हा परिषदेत भुईसपाट झालेल्या भाजपला पंचायत समितीमध्येही अवघ्या चारच, तर काँग्रेसला फक्त तीन जागा जिंकता आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंचायत समितीत चंचूप्रवेश केला. खेडमध्ये मनसेचा एक सदस्य विजयी झाला आहे.
रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि खेड या पाच पंचायत समित्यांवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले. गुहागर पंचायत समिती राष्ट्रवादीने यावेळीही आपल्याकडेच राखली. दापोली पंचायत समिती गेली २५ वर्षे शिवसेनेकडे होती; मात्र यावेळी राष्ट्रवादीने ती आपल्याकडे खेचून घेतली आहे. मंडणगड पंचायत समितीत शिवसेना-राष्ट्रवादीने दोन-दोन जागा जिंकल्या. चिपळूणमध्ये १८ पैकी ९ जागा सेनेला व ९ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. या दोन ठिकाणी त्रिशंकू अवस्था आहे.
५५ जिल्हा परिषद गटांमध्ये एकही जागा न मिळालेल्या भाजपला पंचायत समिती निवडणुकीत काडीचा आधार मिळण्याइतके यश मिळाले. ११0 जागांमध्ये भाजपचे ४ उमेदवार निवडून आले.
निवडणूक विशेष
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
होणार - ३
दहा महापालिकांचा कौल - ५
चंद्रकांतदादा, बापट, निलंगेकर मेरीटमध्ये - ३
चिपळूण, मंडणगडमध्ये
त्रिशंकू - हॅलो २
जिल्हा परिषदेतील विजयी
उमेदवार - हॅलो २