Join us

"सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी"; रोहित पवारांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:43 PM

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत सागर बंगल्याकडे कूच केली होती.

मुंबई - सलाईनमधून विषप्रयोग करणे, एन्काउंटर करण्यासह इतर मार्गांनी मला संपविण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप करत मनोज जरांगे-पाटील यांनी बैठकीतूनच मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली. जरांगे यांनी उपचार घ्यावेत आणि नंतर मुंबईकडे जावे, यासाठी त्यांची मनधरणी करताना समाजबांधवांना मोठी कसरत करावी लागली होती. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत, जरांगेंची भाषा ही ठाकरे व पवारांची स्क्रीप्ट असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. तसेच, सागर बंगला हा सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी नाही, असेही ते म्हणाले.

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत सागर बंगल्याकडे कूच केली होती. मी सागर बंगल्यावर येतोय, माझा बळी घ्या, असेही जरांगे यांनी म्हटलं होतं. जरांगेंच्या या भूमिकेबद्दल आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनीही देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. 

''फडणवीसांनी महाराष्ट्रातून एकता-समानता नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अन् संस्कृती खराब करण्यास फडणवीसचच जबाबदार'' आहेत, असे रोहित पवार यांनी यांनी म्हटले. तसेच, सागर बंगला नेत्यांना वाचवण्यासाठी आहे, सागर बंगला हा आमदारांना वाचवण्यासाठी आहे, सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी आहे. पण, गरिबांना ज्या अडचणी आहेत, त्यासाठी सागर बंगला काहीही मदत करत नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, रोहित पवार यांनी पंढरीत विठुरायाचरणी तुतारी अर्पण केली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. 

मनोज जरांगे परत अंतरवालीत फिरले

जरांगे यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक बोलाविली होती. बैठकीत ते म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी समाजाचा आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पाठबळामुळे काही जण समोर येऊन आरोप करीत आहेत. उपोषणात मरू द्यावे, सलाईनमधून विष द्यावे, एन्काउंटर करावे, ४२० दाखल करून जेलमध्ये घालावे, असे फडणवीस यांना वाटते, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला. त्यानंतर, ते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र, सहकाऱ्यांनी रोखल्यानंतर, व अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यामुळे ते परत अंतरवालीत फिरले आहेत. 

सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका - मुख्यमंत्री

मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट बोलत आहेत. त्यांच्या विधानांमागील षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश होईल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्र परिषदेत केला. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसरोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामनोज जरांगे-पाटील