मुंबई : पुणेस्थित सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या ४३९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेतील एक कर्जदार सागर मारुती सूर्यवंशी याला ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केली आहे. त्याला ईडीच्या मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला २६ जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, या बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांत अनेक गुन्हे दाखल होते. मात्र, या बँकेच्या संचालकांनी बँकेतील पैशांची अफरातफर केल्याचे उघडकीस आल्यानंतर याचा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला होता. ईडीने चौकशी केली असता बँकेचा सर्वेसर्वा अमर मूलचंदानी यांनी बँकेतील पैशांचा वापर कौटुंबिक मालकीची कंपनी असल्याप्रमाणे केल्याचा ठपका ईडीने ठेवला तसेच त्याने कर्ज देताना नियमांचे पालन केले नसल्याचेही ईडीच्या तपासात दिसून आले.
१२४ कर्ज खात्यांमुळे ४२९ काेटींचा फटकाबँकेने दिलेल्या कर्जांपैकी तब्बल १२४ खाती थकली आहेत. या माध्यमातून बँकेला ४२९ कोटी रुपयांचा फटका बसला.यांपैकी १० कर्ज खाती सागर मारुती सूर्यवंशी याची होती. त्याने या माध्यमातून बँकेचे ६० कोटी ६७ लाख रुपये थकविल्याचाही ठपका ईडीने त्याच्यावर ठेवत त्याला अटक केली आहे.सागर सूर्यवंशी याची कर्जासाठी आवश्यक आर्थिक पत नसतानाही अमर मूलचंदानी याच्याशी संधान साधत त्याने हे कर्ज मिळवले व थकवले, असा आरोप ईडीने त्याच्यावर ठेवला आहे.