Join us

दुर्ग संवर्धनाने सह्याद्रीचा राज्याला सलाम!

By admin | Published: May 03, 2017 6:23 AM

राज्यातील विविध गड किल्ल्यांवर दुर्ग संवर्धन मोहिम घेऊन सह्याद्री प्रतिष्ठानने महाराष्ट्र दिनी दुर्ग दिन साजरा केला. संस्थेचे संस्थापक

मुंबई : राज्यातील विविध गड किल्ल्यांवर दुर्ग संवर्धन मोहिम घेऊन सह्याद्री प्रतिष्ठानने महाराष्ट्र दिनी दुर्ग दिन साजरा केला. संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचवेळी राज्यातील १६ गडकिल्ल्यांवर दुर्ग दिन साजरा झाला.सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गडाचे दरवाजे, तटबंदी, बुरूज या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी काढून दीप प्रज्ज्वलित केले. पहाटे गडावरील कचरा गोळा करून तटबंदी आणि बुरूज या ठिकाणी फुलांचे तोरण लावण्यात आले. गडपूजा करत गडावर भगवा ध्वजाला मानवंदना देऊन मोहिमेचा समारोप करण्यात आला. या वर्षी मोहिमेत नव्याने सहभागी झालेल्या तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. जागोजागी तरुणांनी या दिवसाचे महत्त्व व दुर्ग संवर्धन विषय समजून घेऊन अधिक जनजागृती करण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष गणेश खुटवड यांनी सर्व नियोजनाचा आढावा घेऊन संस्थेच्या सर्व सदस्यांना दुर्ग दिनाबद्दल माहिती दिली. राज्यातील गडकिल्ल्यांची सद्यस्थिती बिकट असून, काही किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले. खुटवड म्हणाले की, पुढील पिढीला काही किल्ले दिसतील की नाही, याची संभावना सांगता येत नाही. म्हणूनच तरुण पिढीने दुर्ग संवर्धन चळवळीत मोठ्या संखेने सामील होण्याची गरज आहे. या वेळी दुर्ग संवर्धनासह स्वतंत्र चळवळीत आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या क्रांतिकारकांना मानवंदनाही देण्यात आली. (प्रतिनिधी)या ठिकाणी साजरा झाला दुर्ग दिन!पुण्यातील मावळमधील कोराई गड, कर्जतमधील ढाक आणि कोथळी /पेठ किल्ला, पनवेलमधील कर्नाळा किल्ला, रत्नागिरीमधील मंडणगड व रत्नगड, चाळीसगावमधील मल्हारगड व पारोळ, ठाणे शहापूरमधील माहुली, साताऱ्यातील वर्धनगड, जंगली जयगड आणि गुणवंत गड, नवी मुंबईतील बेलापूर किल्ला, चंद्रपूरमधील जटपूर गेट किल्ला, वसईतील मांडवी, महाडमधील सोनगड या गडकिल्ल्यांवर संवर्धन मोहीम राबवण्यात आली.प्रदर्शनातून इतिहासमुंबई : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ५७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बोरीवली पश्चिम येथील देवीदास लेन अटल काव्य उद्यान या ठिकाणी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत, ‘५७ वर्षे सुवर्ण कलशाची, गौरवशाली महाराष्ट्राची’ या विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३ मे पर्यंत सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत खुले आहे. दहिसर विधानसभेचे आमदार मनीषा चौधरी यांनी प्रदर्शनाची मांडणी केली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आणि आपले राज्य विकासाच्या दिशेने करत असलेली घोडदौड याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी. पुढच्या पिढीला महाराष्ट्राचा इतिहास ज्ञात व्हावा आणि ज्यांनी राज्यासाठी बलिदान दिले, त्यांना वंदन करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दरम्यान, माजी शिक्षणमंत्री दत्ताजी राणे, सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. इतिहास हा फक्त पुस्तकांच्या माध्यमातून वाचून कळत नाही, तर कलेच्या माध्यमातून लोकांना लवकर समजतो. परिणामी, मातृभाषेतूनच शिक्षण घेण्यात यावे, असे आवाहन दत्ताजी राणे यांनी या वेळी केले. (प्रतिनिधी)