‘साहेब, मी समाजसेवेत व्यस्त होतो... आता करा छाननी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:33 AM2019-04-12T02:33:26+5:302019-04-12T02:33:47+5:30
छाननीदरम्यान उमेदवाराने कार्यालयात हजर राहावे म्हणून पत्राबरोबरच त्याला कॉल करून कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.
- मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छाननीदरम्यान उमेदवाराने कार्यालयात हजर राहावे म्हणून पत्राबरोबरच त्याला कॉल करून कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. अशात कार्यालयीन वेळ संपताच उमेदवार हजर झाला आणि ‘साहेब, मी समाजसेवेत व्यस्त होतो... असा कसा माझा अर्ज बाद करू शकता? त्रुटी दुरुस्त करत, अर्ज परत घ्या,’ असे म्हणत त्याने कार्यालयातच तळ ठोकल्याचे चित्र उत्तर पूर्व मुंबईत पाहावयास मिळाले. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना नियमाच्या चौकटीत उभे करत, समजूत काढल्यानंतर, दोन ते तीन तासांनी हे अपक्ष उमेदवार घरी परतले.
उत्तर पूर्व मुंबईत ५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. प्रकाश गोपाळ जाधव, नंदकुमार बिरबल सिंह, अॅड. संतोष कुस्साप्पा शेट्टी, गजाला बानू मोह. अरिफ शेख, देवेंद्र रामचंद्र जोशी (गुजरे) यांचा समावेश असून हे सर्व अपक्ष उमेदवार होते. त्यातील एकाने तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून अर्ज दाखल करत, प्रतिज्ञापत्र न देता कागदावर स्वत:च अर्ज भरून सादर केला. त्यात काहींनी एकच सूचक दोघांना दाखविले, तर काहींनी यादी क्रमांकच दिला नव्हता. यातील मंडळी ही माहिम, नालासोपारा येथील रहिवासी आहेत.
उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती मिळताच, उमेदवाराने कार्यालयात हजर राहण्याबाबत कळविलेच नसल्याचा आव आणला. मात्र, ‘अहो थेट तहसीलदाराच्या मोबाइल क्रमांकावरूनही कॉल केल्याचे त्यांना दाखविण्यात आले. तेव्हा मात्र अपक्ष उभे राहिलो म्हणून धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे अनोळखी क्रमांक उचलला नसल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. अशा वेळी अधिकाºयांना स्वत:च्या डोक्यावर हात मारण्याची वेळ आली होती.