साहेब.. पत्नी पळून गेली तर माझी जबाबदारी नाही; पतीने मांडली पोलिसांसमोर व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 05:22 AM2018-07-04T05:22:11+5:302018-07-04T05:22:52+5:30

कुणाला कधी कशाचा नाद जडेल हे सांगता येत नाही. पदरात दोन मुले. त्यात लग्नाला १९ वर्षे झाली असताना विवाहितेला सिनेमात काम करण्याचे वेड लागले. याच वेडापायी ती पती आणि मुलांना वाऱ्यावर सोडून घरातून वरचेवर पळून जाऊ लागली.

 Saheb .. If the wife is escaped, then it is not my responsibility; Sadness in front of the deputy police officer | साहेब.. पत्नी पळून गेली तर माझी जबाबदारी नाही; पतीने मांडली पोलिसांसमोर व्यथा

साहेब.. पत्नी पळून गेली तर माझी जबाबदारी नाही; पतीने मांडली पोलिसांसमोर व्यथा

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : कुणाला कधी कशाचा नाद जडेल हे सांगता येत नाही. पदरात दोन मुले. त्यात लग्नाला १९ वर्षे झाली असताना विवाहितेला सिनेमात काम करण्याचे वेड लागले. याच वेडापायी ती पती आणि मुलांना वाऱ्यावर सोडून घरातून वरचेवर पळून जाऊ लागली. पत्नीच्या या पराक्रमामुळे घाबरलेल्या पतीदेवाने अखेर पोलीस ठाणे गाठले. ‘साहेब... बघा ना पत्नी सारखी घर सोडून जाते. तिला सिनेमात काम करायचेय. पळून गेलेल्या पत्नीला अनेकदा शोधून आणले आहे. पण आता मी कंटाळलोय.. यापुढे ती पळून गेली तर माझी जबाबदारी नाही,’ असे पोलिसांना सांगून त्या पतीने आपली कैफियत मांडली. पत्नीविरुद्ध अशी अजब तक्रार घेऊन आलेल्या पतीमुळे पोलीसही चक्रावले. द्विधा मनस्थितीत अडकलेल्या भायखळा पोलिसांनी या प्रकरणी एनसी दाखल केली आहे.
भायखळा परिसरात हरिश हा पत्नी नेहा (नावात बदल) आणि दोन मुलांसोबत राहतो. तो खासगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नाला १९ वर्षे झाली. तेथीलच एकाने पत्नीला सिनेमात काम करण्याचे स्वप्न दाखविले. तिही त्याच्या आमिषाला भुलली. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे कितपत योग्य, म्हणून हरेशने पत्नीला विरोध केला.
मात्र पती आपल्या भविष्यासाठी अडचण ठरूशकतो, म्हणून घटस्फोटासाठी की काय, तिने त्याच्याच विरुद्ध पोलिसांत तक्रारी देण्यास सुरुवात केली. सिनेमात काम करण्याच्या मोहात ती सारखी घराबाहेर जाऊ लागली. क्षुल्लक भांडणातही पतीला घर सोडून जाण्याची धमकी देऊ लागली. यापूर्वीही जेव्हा ती घराबाहेर निघून गेली तेव्हा पतीनेच तिला शोधून आणले.
गेल्या आठवड्यात तिने भायखळा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली. पत्नीच्या या प्रकारामुळे हरिश घाबरला. संसार टिकावा म्हणून सर्व प्रयत्न करूनदेखील काहीच मार्ग निघत नसल्याने कंटाळलेल्या पतीने १ जुलै रोजी पोलीस ठाणे गाठले.
‘साहेब.. आतापर्यंत पत्नीचे सर्व हट्ट पुरविले. मात्र सिनेमात काम करण्याच्या वेडामुळे ती घर सोडून जाऊ लागली. तिला आता मी नको आहे. यात काही कमी-जास्त झाल्यास माझ्यावरच कारवाई कराल. त्यामुळे ती पळून गेली तर माझी जबाबदारी राहणार नाही. तुम्हीच तिला समजवा,’ असे हरिशने पोलिसांना सांगितले.

पत्नीविरुद्ध एनसी
पोलिसांनी पत्नीलाही बोलावून घेतले. तेव्हा पत्नीने हरिशविरुद्ध पुन्हा तक्रारीचा पाढा सुरू केला. पोलिसांनी दोघांचीही समजूत काढली. या प्रकरणी हरिशच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध एनसी दाखल केली. त्याने आपल्या एनसीमध्ये वरील घटनेला वाचा फोडली.

Web Title:  Saheb .. If the wife is escaped, then it is not my responsibility; Sadness in front of the deputy police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.