‘संगीत स्वयंवर’ने प्रारंभ
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेल्या गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यगृहात, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले १० महिने नाट्यप्रयोग रंगले नाहीत. मात्र आता या नाट्यगृहात पुन्हा एकदा ‘तिसरी घंटा’ वाजणार आहे. शनिवार, २३ जानेवारीपासून या नाट्यगृहात प्रयोगांचा शुभारंभ होत आहे. साहजिकच, समस्त गिरगावकर आणि नाट्यवेड्या मुंबईकरांसाठी ही पर्वणी आहे.
मराठी रंगभूमी दिनापासून (५ नोव्हेंबर) नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली; परंतु साहित्य संघ मंदिराच्या डॉ. अ. ना. भालेराव नाट्यगृहात अद्याप नाट्यप्रयोग सादर झाला नव्हता. मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान असलेल्या ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाच्या, नवीन कलाकार संचातील प्रयोगाने हे नाट्यगृह आता खऱ्या अर्थाने ‘अनलॉक’ होत आहे. ‘अमृत नाट्य भारती’ या मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेतर्फे हा प्रयोग होत आहे. दरम्यान, सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करत हा नाट्यप्रयोग होणार असल्याचे मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेचे कार्यवाह आणि या नाटकाचे दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील काही नाट्यगृहांत प्रयोग सुरू झाले असताना साहित्य संघात कधी प्रयोग होणार, अशी चर्चा नाट्यवर्तुळात होती. या नाट्यगृहात आता प्रयोग रंगणार असल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, तब्बल १० महिन्यांनंतर साहित्य संघ मंदिर नाट्यप्रयोगासाठी सज्ज झाले आहे.
चौकट-
विनामानधन प्रयोग
या प्रयोगातील ॐकार प्रभुघाटे, चिन्मय पाटसकर, सुनील जोशी व संपदा माने हे युवा कलावंत मायबाप रसिकांसाठी नाट्यसेवा म्हणून या प्रयोगासाठी मानधन घेणार नाहीत.