साहित्यशारदेचा ‘रत्नाकर’ पंचत्त्वात विलीन; बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने आकस्मिकरीत्या घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:17 AM2020-05-19T05:17:15+5:302020-05-19T05:17:39+5:30
वडाळा येथे मतकरी यांचे निवासस्थान आहे. गेल्या काही दिवसांपासून मतकरी यांना थकवा जाणवत होता. आरोग्य तपासणीसाठी त्यांना विक्रोळी येथील गोदरेज रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री मुंबईत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मतकरी यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या सुप्रिया विनोद, पुत्र गणेश, जावई डॉ. मिलिंद विनोद, स्नुषा पल्लवी आणि नातवंडे, असा परिवार आहे.
वडाळा येथे मतकरी यांचे निवासस्थान आहे. गेल्या काही दिवसांपासून मतकरी यांना थकवा जाणवत होता. आरोग्य तपासणीसाठी त्यांना विक्रोळी येथील गोदरेज रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अंधेरी येथील सेव्हन हिल्स रूग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे १७ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुबियांनी दुरून त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
अविरत लेखन करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाट्य चळवळीला संजीवनी देणारे साहित्यिक, स्तंभलेखक, चित्रकार, चित्रपट व मालिका लेखक, एकपात्री कथाकथनकार अशा विविधांगी भूमिका लीलया निभावणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून मतकरी परिचित होते.
मोठ्यांसाठी तब्बल ७० तर मुलांसाठी २२ नाटके, अनेक एकांकिका, २० कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, १२ लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरील कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.