कोरीगड, सुधागड संवर्धनासाठी ‘सह्याद्री’ची हाक
By Admin | Published: July 6, 2017 06:53 AM2017-07-06T06:53:59+5:302017-07-06T06:53:59+5:30
पुण्यातील मावळ तालुक्यातील कोरीगड आणि उरण येथील सुधागडच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील मावळ तालुक्यातील कोरीगड आणि उरण येथील सुधागडच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. कोरीगडवर ९ जुलैला, तर १६ जुलैला सुधागडावर प्रतिष्ठानतर्फे संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, कोरीगड मोहिमेत गणेश दरवाज्यातून आत गेल्यावर, डाव्या बाजूला पूर्णपणे बुजलेले पाण्याचे टाके साफ करण्यात येतील. याशिवाय गडावर माहिती फलक लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने हे काम होत आहे. दरम्यान, गणेश दरवाज्यावर भगवा ध्वज लावण्यात येईल, तर उरण येथील सुधागड मोहिमेत दुर्गदर्शन करून, त्याची ऐतिहासिक माहिती दुर्गप्रेमींना दिली जाईल. या वेळी काही प्रमाणात दुर्ग संवर्धनाची कामे केली जातील.
कोरीगडला पोहोचण्यासाठी मुंबई-पुणे येथील दुर्गप्रेमींनी लोणावळा-बुशी धरणमार्गे संतोष हॉटेल गाठावे. तेथून ४ किमी अंतरावर कोरीगड पायथा पेठशहापूर येथे यावे, तर सुधागड दर्शनासाठी येणाऱ्या दुर्गप्रेमींनी सकाळी ७ वाजता उरणच्या चिरनेर हायस्कूल येथे जमावे. उरणहून येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी वाहतुकीची नि:शुल्क व्यवस्था केली जाईल. तिथून ९ वाजेपर्यंत गडाच्या पायथ्याजवळ पोहोचावे. ९.३० वाजता गड चढण्यास सुरुवात होईल.
हे लक्षात ठेवा...
दुर्ग संवर्धन मोहिमेत सामील होणाऱ्या दुर्गप्रेमींनी सकाळी ९ वाजता कोरीगडाच्या पायथ्याशी पेठ शहापूर येथे पोहोचावे.सुधागड मोहिमेत सामील होणाऱ्या दुर्गप्रेमींनी सकाळी ९ वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी जमावे.
या सर्व दुर्ग संवर्धन व दुर्ग दर्शन मोहीम नि:शुल्क आहेत. मात्र, प्रत्येक दुर्गप्रेमीने जेवणाचे डबे स्वत: आणायचे आहेत.कोरीगड मोहिमेत सकाळच्या अल्पोपहाराची व्यवस्था प्रतिष्ठानतर्फे केली जाईल.
मोहीम प्रमुखांच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास, त्याच वेळेस मोहिमेतून रजा दिली जाईल.दुर्ग संवर्धनाचे काम असल्याने, कोणीही केवळ पिकनिक म्हणून येऊ नये. या वेळी स्वच्छतेपासून विविध कामे करण्याची मानसिक तयारी असावी.