‘सह्याद्री नवरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा रंगला
By admin | Published: April 28, 2015 01:14 AM2015-04-28T01:14:11+5:302015-04-28T01:14:11+5:30
मोहोर उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरव दूरदर्शनतर्फे गुरुवारी संध्याकाळी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे करण्यात आला.
मुंबई : संगीत नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत अलौकिक कामगिरी करून मोहोर उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरव दूरदर्शनतर्फे गुरुवारी संध्याकाळी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे करण्यात आला. या सोहळ्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित होते. या वेळी दूरदर्शनचे महासंचालक मुकेश शर्मा, अभिनेता विक्रम गोखले व अनेक मान्यवर उपस्थित होते.
यंदाचा चौदावा सह्याद्री नवरत्न जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ग.रा. कामत यांना प्रदान करण्यात आला. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी रेखा कामत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्वररत्न पुरस्काराने प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांना गौरविण्यात आले. ‘रत्नदर्पण’ पुरस्कार सुरेश द्वादशीवार यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर यांना ‘नाट्यरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘सह्याद्री साहित्यरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना प्रदान करण्यात आला. तर ‘रत्नशारदा’ पुरस्काराने डॉ. तारा भवाळकर यांना गौरविण्यात आले. ‘चित्ररत्न’ पुरस्कार अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे यांना देण्यात आला. वाहन उद्योगात विशेष ठसा उमटवणाऱ्या ‘भारत फोर्ज’ या पुण्यातील कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांना ‘सह्याद्री रत्नवैभव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कला क्षेत्रात विशेष यश मिळवलेले प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांना ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे स्वास्थ्य ठीक नसल्याने त्यांच्या ज्येष्ठ कन्येने हा पुरस्कार स्वीकारला. तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा ‘रत्नसौरभ’ पुरस्कार जलतरणपटू वीरधवल खाडे याला प्रदान करण्यात आला. सर्व पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वर्षीच्या नवरत्न पुरस्कार निवड समितीमध्ये माजी मुंबई महानगरपालिका आयुक्त करुण श्रीवास्तव, निवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, ज्येष्ठ उद्योजक विजय कलंत्री हे होते. या सर्वांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. अभिनेत्री प्रिया मराठे हिला ‘फेस आॅफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)