दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरण: निलंबित उपविभागीय अधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 09:34 AM2023-03-15T09:34:18+5:302023-03-15T09:34:40+5:30
दापोली येथील साई रिसॉर्ट मनी लॉंड्रिंग प्रकरणात सदानंद कदम यांच्यापाठोपाठ निलंबित उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यालाही ईडीने मंगळवारी अटक केली.
आशिष सिंह, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:दापोली येथील साई रिसॉर्ट मनी लॉंड्रिंग प्रकरणात सदानंद कदम यांच्यापाठोपाठ निलंबित उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यालाही ईडीने मंगळवारी अटक केली. या प्रकरणात सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.
जयराम देशपांडे यांना गेल्या जानेवारी महिन्यात राज्य सरकारने निलंबित केले होते. सन २०१७ ते २०१९ या कालावधीत देशपांडे याने साई रिसॉर्ट उभारण्यात आलेली अकृषिक जमीन बेकायदेशीररीत्या व्यावसायिक जागेत बदलण्यापासून ते सागरकिनारा नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करीत अनिल परब आणि सदानंद कदम यांना मदत केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीत आढळले होते.
मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीने सर्वप्रथम जयराम देशपांडे याचा जबाब नोंदवला होता. २०१७ साली अनिल परब यांनी दापोली येथे विभास रंजन साठे यांच्याकडून एक कोटी रुपयांना एक एकर जमीन खरेदी केली होती.
जयराम देशपांडे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याचे वकील तनवीर निझाम यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार करण्यात आलेली ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. आता देशपांडे या पदावर नसल्याने त्या विभागाच्या अन्य अधिकाऱ्याला यासाठी जबाबदार धरण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले. ईडीने या प्रकरणात जयराम देशपांडे याने सरकारी पदाचा गैरवापर केल्याने तोही आरोपी असून तपासासाठी ईडीची कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने देशपांडे याला १८ मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"