Join us  

साई रिसॉर्ट प्रकरण; आरोपपत्राची विशेष न्यायालयाने घेतली दखल; ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब कुठे आहेत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 7:18 AM

दापोली येथील साई रिसॉर्ट आर्थिक अफरातफरीप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी घेतली.

मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्ट आर्थिक अफरातफरीप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी घेतली. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना आरोपी करण्यात आलेले नाही. याप्रकरणात ईडीने आतापर्यंत १०.२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. मात्र, न्या. एम. जी. देशपांडे यांनी मंगळवारी या आरोपपत्राची दखल घेतली. हे आरोपपत्र अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम व तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आले. ईडीने सुधीर पार्दुले, विनोद दीपोलकर, सुरेश शंकर तुपे आणि अनंत कोळी यांना ईडीने आरोपी केले आहे.

आनंदाची बातमी! वळवाची चिंता नको, यंदा पाऊस पडेल भरघोस: डॉ. अनुपम कश्यपी

केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाने साई रिसॉर्ट व अन्य काही रिसॉर्टनी पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केले असे म्हणत तक्रार केली. या तक्रारीचा आधार घेत ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या दृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, आर्थिक व्यवहारासंबंधी माहिती लपविण्यात आली.

२०१७ च्या सुरुवातीला जमीन मालक विभास साठे यांनी विनोद दीपोलकर यांच्याशी संपर्क साधला. विनोद हे दापोलीची जमीन विकण्यासाठी एजंट म्हणून काम करत होते. विनोद संबंधित जमिनीच्या खरेदीसाठी ग्राहकाच्या शोधात होते आणि त्यांची भेट सदानंद कदम यांच्याशी झाली.

 एप्रिल २०१७मध्ये विनोद याने साठे यांना जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी कदम यांच्या कार्यालयात नेले. आपण अनिल परब यांच्या वतीने व्यवहार करत असल्याची माहिती कदम यांनी दोघांना दिली. तसेच १.८० लाखांच्या जमीन खरेदी व्यवहारात एक कोटी रुपये चेकद्वारे देण्यात येतील तर ८० लाख रुपये रोखीने देण्यात येतील, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

कदम यांच्याकडून परब यांच्या नावाचा वापर

कदम यांनी परब यांच्या नावाचा वापर करत कृषिक जमीन अकृषिक करून घेतली. सर्व परवानग्या मिळवण्यासाठी कदम यांनी परबांचे नाव वापरले. परब यांनी दि. २ मे २०१७ रोजी जमिनीचा प्रत्यक्षात ताबा घेतला, असे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. परब यांच्यावतीने कदम यांनी सर्कल अधिकारी सुधीर पार्दुले यांच्यावर दबाव आणल्याने जागेला भेट न देताच तपासणी अहवाल प्रांताधिकारींकडे पाठवला, असा आरोप ईडीने केला आहे.

दि. २ मे २०१७ रोजी परब यांनी साठे यांच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर कदम यांनी ८० लाख रुपये विनोदला दिले आणि त्याने ती रक्कम साठे यांना दिली. या व्यवहारातून विनोदला ३ लाख रुपये कमिशन म्हणून मिळाले.

टॅग्स :अनिल परबमुंबई