एसएआयसी मोटर आणि जेएसडब्ल्यू ग्रुप आले एकत्र; देखण्या 'सायबरस्टर' इव्ही स्पोर्टस कारचे अनावरण
By संजय घावरे | Published: March 20, 2024 05:11 PM2024-03-20T17:11:29+5:302024-03-20T17:12:17+5:30
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचा व्यवसाय रोडमॅप तयार.
संजय घावरे, मुंबई : भारतातील बी२बी व बी२सी क्षेत्रांमध्ये रूची असलेला आघाडीचा समूह जेएसडब्ल्यू ग्रुपने एमजी मोटर इंडियासोबत नवीन धोरणात्मक संयुक्त उद्यम जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रा. लि.च्या व्यावसायिक रोडमॅपची घोषणा केली आहे. यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली सायबरस्टर ही वीजेवर चालणारी लक्झरी स्पोर्टस कारही सादर केली.
वरळीतील एनएससीआयमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य कार्यक्रमात जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रा. लि.ची घोषणा करत सायबरस्टर या स्पोर्टस कारचे अनावरण करण्यात आले. यावेळी एमजी मोटर इंडियाचे सीईओ एमिरेटस राजीव छाबा, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल, जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाच्या संचालन समितीचे सदस्य पार्थ जिंदाल उपस्थित होते. यावेळी जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रा. लि.च्या आगामी योजनांबाबत माहिती देण्यात आली. एका चार्जमध्ये ८०० किमी धावणाऱ्या सायबरस्टर हि बहुप्रतीक्षीत कारही यावेळी सादर करण्यात आली. या नवीन संयुक्त उद्यमाला भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील उदयास येत असलेल्या संधींचा फायदा होणार आहे. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया ग्राहकांना स्मार्ट व शाश्वत उत्पादने देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
कंपनीसाठी व्यवसाय रोडमॅप व्यापक स्थानिकीकरण आणि देशभरात प्रबळ ऑटोमोटिव्ह इकोसिस्टमच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संयुक्त उद्यम पुरवठा साखळीच्या फॉरवर्ड व बॅकवर्ड एकीकरणासह प्रबळ ईव्ही इकोसिस्टम निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. सध्याच्या वार्षिक एक लाख वाहनांवरून जवळपास तीन लाख वाहनांपर्यंत उत्पादन क्षमता वाढवण्यात येणार आहे. न्यू एनर्जी वेईकल्सवर (एनईव्ही) लक्ष केंद्रित करण्यासह यंदा सणासुदीच्या काळात दर तीन ते सहा महिन्यांनी नवीन लाँचसह उत्पादन वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे. प्रीमियम पॅसेंजर वेईकल चॅनेलमध्ये प्रवेश करणे, व्यापक स्थानिकीकरणासह उत्पादन फूटप्रिंटमध्ये वाढ करणे, स्किलिंगवर भर देण्यासोबत मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण करणे आदी योजना आहेत.
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया हा महत्त्वपूर्ण संयुक्त उद्यम असल्याचे सांगत यावेळी पार्थ जिंदाल म्हणाले की, या संयुक्त उद्यमासाठी दोन मोठ्या कंपन्या एसएआयसी व जेएसडब्ल्यू एकत्र आल्या आहेत. जगप्रसिद्ध ब्रिटीश ब्रँडचा वारसा, अत्याधुनिक एमजी तंत्रज्ञान आणि जेएसडब्ल्यूचे स्थानिक उत्पादन ज्ञान व क्षमतेचा फायदा घेत जेएसडब्ल्यू एमजी भारतासाठी व जगासाठी भारतात जागतिक अग्रणी उत्पादने निर्माण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जेएसडब्ल्यू ग्रुपच्या रूपात भारतात एमजी ब्रँडची विकासगाथा सुरू ठेवण्यासाठी योग्य स्थानिक सहयोगी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत राजीव छाबा म्हणाले की, पाच वर्षांमध्ये टीम एमजी इंडियाने भक्कम फाऊंडेशन केले आहे, ज्यामधून नाविन्यता, वैविध्यता, समुदाय सेवा व प्रबळ ग्राहक सेवेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आज आम्ही देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या ओईएम्सपैकी एक आहोत. हे फाऊंडेशन आम्हाला नवीन चॅप्टर एमजी २.० ला सुरूवात करण्यास सक्षम करणारे असून, संयुक्त उद्यम या प्रवासामध्ये महत्त्वाचे पाऊल ठरेल असेही ते म्हणाले.