सांगितले की फळे आहेत, पण निघाल्या ११ कोटींच्या सिगरेट, परदेशी सिगरेटचा साठा जप्त
By मनोज गडनीस | Published: October 27, 2023 07:30 PM2023-10-27T19:30:57+5:302023-10-27T19:31:43+5:30
Crime News: न्हावाशेवा बंदरात दाखल झालेल्या दोन कन्टेनरमध्ये फळे व मशरूम असल्याची माहिती कागदोपत्री नमूद करण्यात आली होती. मात्र, या फळांच्या ऐवजी याद्वारे तस्करी होत असल्याची पक्की माहिती होती.
- मनोज गडनीस
मुंबई - न्हावाशेवा बंदरात दाखल झालेल्या दोन कन्टेनरमध्ये फळे व मशरूम असल्याची माहिती कागदोपत्री नमूद करण्यात आली होती. मात्र, या फळांच्या ऐवजी याद्वारे तस्करी होत असल्याची पक्की माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या कन्टेनरची झडती घेतली अन् त्यात त्यांना तब्बल ११ कोटी रुपयांच्या परदेशी सिगरेट आढळून आल्या. या परदेशी सिगरेटवर भारतामध्ये बंदी आहे.
थायलंड येथून तस्करीच्या माध्यमातून त्या भारतात आणण्यात आल्या होत्या. मात्र, या तस्करीचा सुगावा लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापेमारी करत याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दिल्लीस्थित एका व्यावसायिकाला अटक देखील करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, परदेशी सिगरेटचा मोठा साठा तस्करी करून मुंबईत दाखल होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चाचपणी सुरू केली असता न्हावा शेवा बंदरात काही कन्टेरन येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.
फळे आणि मशरूम भरून दोन कन्टेनर थायलंड येथून आल्याचे समजल्यावर अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्या दोन्ही कन्टेनरमध्ये मिळून १५ हजार बॉक्समध्ये तब्बल ६३ लाख ५० हजार सिगरेट आढळून आल्या. याच सिगरेटचे आणखी किमान तीन कन्टेनर मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.