Join us

मुंबईत ९० च्या दशकासारखा दहशत माजवण्याचा प्रयत्न; ठाकरे गटाच्या खासदार संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:01 IST

Saif Ali Khan Knife Attack: गृहमंत्र्यांनी अधिक जागरूक होणे गरजेचे आहे. राजकारण कमी आणि कामावर जास्त लक्ष दिले पाहिजे असं खासदार चतुर्वेदी यांनी म्हटलं.

मुंबई - सलमान खानच्या घरावर गोळीबार, बाबा सिद्दिकींची हत्या आणि आता सैफ अली खानवर चाकू हल्ला या घटना वांद्रेसारख्या उच्चभ्रू वस्तीत घडल्या आहेत. ९० च्या दशकासारखं मुंबईत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत. देशाचे गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री स्वत: मुख्यमंत्री आहेत. वांद्रे इथले आमदार मंत्री आहेत तरीही असा प्रकरणातून धडा घेतला जात नाही हे लाजिरवाणं आहे असं सांगत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला.

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की,  वांद्रेसारखा परिसर जिथं सर्वात जास्त सेलिब्रिटी राहतात तिथली सुरक्षा व्यवस्था शहरातील इतर भागापेक्षा जास्त आहे. तिथे अशाप्रकारची घटना होणे यातून शहरात कुणीही सुरक्षित नाही असा संदेश लोकांमध्ये पसरतो. बाबा सिद्दिकी कुटुंबाला न्याय मिळाला नाही. सलमान खान कुटुंब सुरक्षित वातावरणात राहू शकत नाही. आतापर्यंत पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला मुंबईत आणलं का? केंद्र सरकारकडून बिश्नोईला संरक्षण दिले जाते. मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय गृहमंत्र्यांनी अधिक जागरूक होणे गरजेचे आहे. राजकारण कमी आणि कामावर जास्त लक्ष दिले पाहिजे. ज्यारितीने सातत्याने हल्ल्याच्या घटना घडतायेत त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतो. ज्या ज्या घटना घडल्यात त्यात लवकरात लवकर कारवाई करून न्याय दिला पाहिजे. पोलीस यंत्रणाशी संवाद साधून शहरात सुरक्षित वातावरण तयार केले पाहिजे अशी मागणी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.

दरम्यान, सैफ अली खानवरील हल्ला हा धक्कादायक आहे. आज बुलेटप्रुफ घरात राहण्याची सलमान खानवर वेळ आली. दिवसाढवळ्या  बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. बिल्डर लॉबीकडे दुर्लक्ष केले जाते. या सर्व घटना वांद्रे इथं घडल्या आहेत. या घटना प्रसिद्धी व्यक्तींसोबत घडल्या आहेत. हे सर्व मुंबईत दहशत पसरवण्यासाठी केले जातंय असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं. 

टॅग्स :सैफ अली खान उद्धव ठाकरेमुंबई पोलीसदेवेंद्र फडणवीस