लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरी पोलिसांच्या हद्दीत नवीन नागरदास रोड येथे सैफ अली शेख (२४) या तडीपार आरोपीला अटक केली आहे. रेस्टॉरंटमधील कूकला तो चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करताना त्याला अडविण्यास गेलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर त्याने चाकूने हल्ला केला. हे जखमी पोलिस गुन्हे शाखेच्या कक्ष १० मधील अधिकारी व कर्मचारी आहेत.
फिर्यादी देवीराम सोनार हे जुहूच्या एका रेस्टॉरंट अँड बारमध्ये कूक म्हणून काम करतात. त्यांनी अंधेरी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ८ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास ते त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी जोगेश्वरीला गेले होते. मात्र तो न भेटल्याने ते पुन्हा घराच्या दिशेने निघाले. त्याच दरम्यान के. पी. कंपाउंड परिसरात दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यापैकी एकाने त्यांना पकडले तर दुसऱ्याने त्यांच्या खिशात हात घालत जितके पैसे असतील तितके मला दे असे सांगितले. दरम्यान, या मुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.
रेकॉर्डवरील गुन्हेगार तिथे उपस्थित असलेले गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे पोलिस निरीक्षक सावंत, तसेच भजनावळे आणि पथकाने धाव घेत सोनार यांना आरोपीपासून सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेख याने त्यापैकी पोलिस निरीक्षक चौधरी आणि डफळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्याला पोलिसांनी पकडले तर त्याचा साथीदार हा पळून गेला. शेखची चौकशी केली असता तो सहार पोलिस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजले. तसेच त्याला परिमंडळ ८ मधून हद्दपार करण्यात आल्याचेही उघड झाले. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.