ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२३ - सैफने कधील 'पद्म' पुरस्काराचाी मागणी केली नव्हती, त्याला तो बहाल करण्यात आला होता, त्यामुळे सरकारने आता तो परत घेतला तरी सैफची हरकत नसेल, असे सैफ अली खानची पत्नी व अभिनेत्री करीना कपूरने म्हटले आहे. मुंबईतील एका न्यायालयात सैफविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आल्याने सरकार त्याचा 'पद्म' पुरस्कार परत घेण्याच्या विचारात असल्याच्या मुद्यावरून सध्या बराच वाद सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना करीनाने हे उत्तर दिले. सैफ अली खानने मात्र अद्याप या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
'सैफने पद्म पुरस्कारासाठी कधीच तगाडा लावला नव्हता, त्याला तो मिळाला होता. त्यामुळे जर आता सरकारला पुरस्कार परत घ्यायाचा असेल तर सैफ तो पुरस्कार आनंदाने परत करेल' असे करीना म्हणाली.
मुंबईतील एका हॉटेलमध्ये सैफ व त्याच्या दोन मित्रांनी दक्षिण आफ्रिकेतील एक उद्योगपती व त्याच्या सास-यांना मारहाण केल्याप्रकरणी खटला सुरू असून मुंबई न्यायालयाने त्यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. आरटीआय कार्यकर्ते एस. सी. अगरवाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार दाखल करून 'एखाद्या व्यक्तीचे नुकसान करणा-या सैफचा सन्मान काढून घ्यावा' अशी मागणी केली होती.
दरम्यान सैफला 'पद्म' पुरस्कार जाहीर झाल्यावरही या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. ' एवढा मोठा पुरस्कार देण्याइतपत सैफचे या क्षेत्रात योगदान काय?' असा प्रश्नही विचारण्यात आला होता.