अनिरुद्ध पाटील
बोर्डी : अंथरुणाला खिळलेल्या वडिलांची शेवटची भेट घेण्यासाठी जीव धोक्यात घालून क्षमतेपेक्षा अधिक खलाशांनी भरलेल्या बोटीतून खोल समुद्रातला प्रवास केला. त्यानंतर सीमेनजीक आल्यावर प्रशासनाकडे साकडे घातल्यानंतरही वेरावल बंदरात माघारी पाठविण्यात आल्याने डहाणूतील खलाशाला जन्मदात्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही.
गुजरात राज्याच्या विविध बंदरात पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी रोजगाराकरिता गेले असून लॉकडाउनमुळे अडकल्याने मरणयातना भोगत आहेत. दरम्यान आजारपणामुळे प्रकृती खालावल्याने वडील शेवटच्या घटका मोजत असल्याचे गुजरातच्या वेरावल बंदरात असलेल्या डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या अंकेश प्रकाश आगरी याला कुटुंबीयांनी कळविले. वडिलांच्या भेटीसाठी त्याने महाराष्ट्र-गुजरात सीमेकडे क्षमतेपेक्षा अधिक खलाशांना घेऊन निघालेल्या बोटीद्वारे खोल समुद्रातून प्रवास करून शनिवार, ५ एप्रिल रोजी उंबरगाव गाठले. मात्र तेथे गुजरातच्या खलाशांना उतरवून पालघर जिल्ह्यातील खलाशांना हुसकावून लावत गोळीबार करण्याची धमकी देत, नांगरलेल्या बोटींचे दोरखंड कापले गेले.माघारी फिरले तर वडिलांची भेट अशक्य असल्याने आगरी यांनी पालघर जिल्हा नियंत्रण कक्ष आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. आजतागायत हजारो खलाशी गुजरात बंदरात खितपत पडले आहेत.दरम्यान शनिवार, ११ एप्रिल रोजी लॉकडाउन वाढवल्याची बातमी आल्यानंतर खलाशांच्या संयमाचा बांध फुटला. तर वडिलांची भेट अशक्य असल्याच्या मनस्थितीत असतानाच शनिवारी संध्याकाळी वडिलांचे निधन झाल्याच्या निरोपाने अंकेश आगरी याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून अंत्ययात्रा, त्याचप्रमाणे दिवसकार्यालाही उपस्थित राहता येणार नसल्याने हताश झाला आहे.