लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संकटात नाविक कामगारांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वैद्यकीय सामुग्रीसह अत्यावश्यक सेवेतील मालाची वाहतूक, देशाप्रती समर्पित भावनेतून बचावकार्यात घेतलेला सहभाग कौतुकास्पद आहे, असे मत आंतरराष्ट्रीय वाहतूक महासंघाचे सरचिटणीस स्टीफन कॉटन यांनी व्यक्त केले.
नुसीं कामगार संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त दूरचित्रसंवाद माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाकाळात नुसींतर्फे पंतप्रधान मदत निधीला २५ लाख, तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ५ लाख रुपये देण्यात आले. ११ हजार ५८२ सेवानिवृत्त नाविक कामगारांच्या खात्यावर तीन हजार रुपये मदत जमा करण्यात आली. तसेच ६४६७ विधवा महिलांना पाच हजार रुपये मदत केली. शिवाय नाविक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून १० व्हेंटिलेटर बेड व १०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रॅटर देण्यात आले. १२५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या नुसीं संघटनेचे हे कार्य इतरांना प्रेरित करणारे आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.