डहाणू/बोर्डी : मासेमारी बोटीवरील खलाशी परवान्यासाठी पोलीस पाटलांच्या दाखल्याची मागणी केली जाते. मात्र डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील अनेक गावांमध्ये ही पदे रिक्त असल्याने काही गावातील पोलीस पाटील प्रतिदाखला पाचशे रुपये फी आकारून मच्छीमारांचे शोषण करीत आहेत. याबाबत प्रशासनाने रिक्त पदे तत्काळ भरावीत आणि भ्रष्ट पोलीस पाटलांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. देशाला परकीय चलन मिळवून देण्यात मासेमारी व्यवसायाची महत्वपूर्ण भूमिका असून महाराष्ट्रासह, गुजरात आणि गोवा ही राज्य अग्रेसर आहेत. या व्यवसायासाठी कुशल आणि अकुशल मजूर डहाणू, तलासरी, जव्हार, मोखडा, विक्रमगड या आदिवासी तालुक्यातून उपलब्ध होतात. त्यापैकी डहाणू, तलासरी तालुक्यात बेकारीची समस्या गंभीर असल्याने प्रतिवर्षी सुमारे चार ते पाच हजार आदिवासी खलाशी नोकरीनिमित्त आठ महिन्यांसाठी स्थलांतर करतात. दरम्यान, आगामी मासेमारी हंगामाकरिता खलाशी परवाने देण्याचे काम सुरू असल्याने पोलीस पाटील दाखल्यांची गरज भासत आहे. डहाणू तालुक्यात ८५ ग्रामपंचायती आणि तलासरी तालुक्यात २२ ग्रामपंचायती आणि एक ग्रामदान मंडळ आहे. दोन्ही तालुक्यांत एकूण नव्वदपेक्षा अधिक पोलीस पाटीलपदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे हा दाखला मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्याचा फायदा घेऊन काही गावातील भ्रष्ट पोलीस पाटील प्रतिदाखला पाचशे रुपये फी आकारून मच्छीमारांचे शोषण करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासह पोलीस पाटीलपदाची तत्काळ भरती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे. (वार्ताहर) शासनाने मच्छीमारांच्या सुरक्षेकरिता खलाशी व तांडेल यांना बायोमेट्रिक ओळखपत्र सक्तीचे केले आहे. मात्र अज्ञान, शासकीय उदासीनता इ.मुळे हजारो आदिवासी खलाशी व तांडेल यापासून वंचित आहेत. आॅनलाइन दाखल्यांच्या किचकट पद्धतीचा अवलंब करण्यात हे खलाशी सरसावलेले नाहीत. त्यामुळे गुजरात राज्यातील मासेमारी बोटीचे मालक पोलीस पाटील दाखल्याची मागणी करीत असल्याचे स्थानिक खलाशांचे म्हणणे आहे.
खलाशांना हवेत दाखले
By admin | Published: July 12, 2016 2:16 AM