आरोग्य सुरक्षा वाऱ्यावर; दीड वर्षापासून बेरोजगार असलेल्यांची दुहेरी कोंडी
सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय नाविकांना कोरोनाकाळात दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ‘सीफेरर्स वेल्फेअर फंड सोसायटी’च्या माध्यमातून कोरोना कवच देऊ केले. मात्र, या कवचाची मुदत संपल्यानंतर ती वाढविण्यात न आल्याने नाविकांना आरोग्यचिंता सतावू लागली आहे.
जगभरात भ्रमंती करणारे नाविक दररोज कामानिमित्त अनेक लोकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोविडचा धोका सर्वाधिक असल्याची बाब लक्षात घेऊन केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने आरोग्य सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. दि. १ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०२० अशी या कोरोना कवचाची मुदत ठरविण्यात आली. ‘इंडियन सीडीसी’धारक (चलत उन्मोचन प्रमाणपत्र) नाविकांसह त्यांच्या कुटुंबीयांचा अंतर्भाव यात करण्यात आला. कोरोनाची बाधा झालेले नाविक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांपर्यंत उपचार खर्च, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नाविकांच्या वारसांना २ लाखांची रोख मदत असे या आरोग्य विम्याचे स्वरूप होते.
कोरोनाचा विळखा घट्ट झाल्यानंतर नाविकांनाही घरी बसावे लागले. त्यामुळे याकाळात कोरोना कवचाचा त्यांना दिलासा मिळाला. दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ३० जून रोजी अंतिम मुदत संपुष्टात आल्याने यापुढे नाविकांना विमा सुरक्षा मिळणार नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून बेरोजगार असलेले नाविक दुहेरी कोंडीत सापडले आहेत. ना नोकरी ना आरोग्य सुरक्षा, अशी त्यांची स्थिती झाली आहे. तर लसीकरण पूर्ण झाल्यानंतर नोकरीवर रुजू झालेले कर्मचारी देश-विदेशातील नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनाही या सुरक्षेची गरज आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत आम्हाला कोरोना कवच देण्यात यावे, अशी मागणी नाविकांनी केली आहे.
......
राज्यातील २५ जणांना लाभ
‘सीफेरर्स वेल्फेअर फंड सोसायटी’च्या माध्यमातून दिलेले कोरोना कवच या संकटकाळात नाविकांसाठी वरदान ठरत होते. आतापर्यंत राज्यभरातील २५हून अधिक नाविकांना ही मदत मिळवून देण्यात यश आले. वर्ष-दीड वर्षापासून नोकरी नसल्याने नाविकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. अशावेळी किमान आरोग्य सुरक्षा पुरवून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने करायला हवा, असे मत ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी व्यक्त केले.
.....
‘सीफेरर्स वेल्फेअर फंड सोसायटी’च्या माध्यमातून नाविकांना कोरोना सुरक्षा पुरविण्याची मागणी आम्ही केली होती. त्याला यश मिळाले. कित्येक नाविकांना त्याचा फायदा झाला. त्याची मुदत वाढवावी, यासाठी जहाज महानिर्देशनालय आणि शिपिंग मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अभिजित सांगळे, कार्याध्यक्ष, ऑल इंडिया सीफेरर्स युनियन