सुहास शेलारमुंबई : काही वर्षे परदेशी जहाजावर नोकरी करून कुटुंबाला सुखाचे दिवस दाखविण्याचे स्वप्न पाहणारा २३ वर्षीय उमदा मराठी तरुण सध्या जगण्यासाठी संघर्ष करतोय. दलालांनी केलेल्या फसवणुकीमुळे तो दुबईत अडकला आहे.
योगेश तांदळे असे या नाविकाचे नाव आहे. बेलापूर येथील दलालाकरवी १५ नोव्हेंबरला तो शरजहाला गेला. त्या दलालाने एका निलंबित ‘आरपीसीएल’ कंपनीच्या पत्राद्वारे ‘एअरपोर्ट क्लिअरन्स लेटर’ मिळवले. पुढे ७२ तास वैध असलेल्या ‘पोर्ट ऑफ इन्ट्री’ (पीओई) कागदपत्राच्या मदतीने इमिग्रेशन प्रक्रिया पार पाडण्यात आली. ७२ तास पूर्ण होण्याच्या आत मुंबईहून थेट दुबईच्या जहाजावर नेण्यात आले. त्यामुळे कस्टमच्या हातून त्याची कस्टडी गेली आणि तो पूर्णतः कंपनीच्या ताब्यात आला. दलालांनी त्याचा पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे जमा करून घेतली. या दलालांनी त्याला मोठ्या जहाजावर नोकरी लावण्याचे कबूल केले होते. प्रत्यक्षात मात्र लहान बोटीवर नियुक्ती देण्यात आली.
पहिल्यांदाच शीपवर गेलेला हा तरुण स्वयंपाकी म्हणून रुजू झाला. जहाजावर एकटाच भारतीय. त्या बोटीवरील १३ क्रू मेम्बरपैकी बहुतांश जण फिलिपाइन्सचे, काही रशियन, युक्रेनचे आहेत. त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला; पण मैत्रीऐवजी हिनवणी वाट्याला आली. जेवण दिले जात नाही, पाण्याच्या बाटल्या फेकून दिल्या जातात. त्याला फिलिपिनो लोक इतका त्रास देत आहेत की, जगणे असह्य झाले आहे, अशी माहिती संबंधित नाविकाचे नातेवाईक विजय पाटील यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय संस्थेकडे मागितली दादयाविषयी आम्ही दूतावासाच्या सातत्याने संपर्कात आहोत. त्यांना सर्व माहिती इ-मेलद्वारे पाठविली आहे. जहाज किनाऱ्यावर येत नाही तोवर कोणतीही कारवाई करू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पण संबंधित नाविकाच्या संपर्कात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनकडे याप्रकरणी दाद मागितली आहे. त्यांनी यात लक्ष घालण्याची ग्वाही दिल्याची माहिती ऑल इंडिया सीफेरर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी दिली.