मुंबई : महाराष्ट्र-गुजरातेत दरोडे, वाहनचोरीचे अनेक गुन्हे नोंद असलेला सराईत दरोडेखोर ओमप्रकाश यादव ऊर्फ बहाद्दूर याला गुन्हे शाखेच्या जबरी चोरी-दरोडेविरोधी पथकाने गजाआड केले. यादवच्या चौकशीतून मुंबईतील अनेक दरोडे व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता आहे.पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांना यादव अॅन्टॉप हिल परिसरात दरोड्यासाठी येणार असून, त्याच्याकडे घातक शस्त्रे आहेत, अशी माहिती मिळाली होती. एसीपी प्रफुल्ल भोसले, खोत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय ढमाळ, नागेश पुराणिक, विनोद तावडे, अंमलदार उल्हास परब, सुनील नवरत, नितीन जाधव, शिरसाट, दया मोहिते आणि पथकाने सापळा रचून यादवला गजाआड केले. झडतीत त्याच्याकडे एक पिस्तूल व काडतूस सापडले. चौकशीत यादवने गेल्यावर्षी जुलै महिन्यात कांदिवलीच्या गंगर ट्रेडिंग कंपनीची साडेआठ लाखांची रोकड लुटली होती, अशी माहिती मिळाली. याशिवाय सुरत येथील सशस्त्र दरोड्यातही यादवचा सहभाग स्पष्ट झाला आहे. तूर्तास यादवकडे खोत आणि पथक कसून चौकशी करीत आहे. (प्रतिनिधी)
सराईत दरोडेखोर अटकेत
By admin | Published: January 03, 2015 12:54 AM