एड्सविरोधी दिनानिमित्त ‘साई’चा ‘श्रद्धांजली कलश’
By admin | Published: December 3, 2014 02:34 AM2014-12-03T02:34:17+5:302014-12-03T02:34:17+5:30
साईने जागतिक एड्स दिनानिमित्ताने त्यांच्या २५ वर्षांच्या एड्सविरुद्धच्या चळवळीत एड्स या दुर्धर रोगाने बळी पडलेल्या एड्सग्रस्तांना श्रद्धांजली कलशाद्वारे आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.
मुंबई : सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साईने जागतिक एड्स दिनानिमित्ताने त्यांच्या २५ वर्षांच्या एड्सविरुद्धच्या चळवळीत एड्स या दुर्धर रोगाने बळी पडलेल्या एड्सग्रस्तांना श्रद्धांजली कलशाद्वारे आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. कामाठीपुराच्या अकराव्या गल्लीतून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेस मोठ्या प्रमाणावर देहविक्रय करणाऱ्या महिलांचा समावेश होता. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली कलशास पुष्पहार अर्पण केले.
कामाठीपुरा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात टीना घई, विक्रम सिंग, विपिन शर्मा, मरिसा वर्मा आदी बॉलीवूडमधले कलाकार तसेच ‘साई’चे संचालक विनय वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अभिनेत्री टीना घई यांना उपस्थितांशी संवाद साधताना गहिवरून आले. त्या म्हणाल्या, एड्सग्रस्तांना आपला समाज आजदेखील वेगळ्या नजरेने पाहतो. खरं तर हा रोगी एड्सने मरत नाही तर समाजाच्या अशा तुच्छतेच्या वागणुकीमुळे तो बळी पडतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन या एड्सग्रस्तांना आधार दिला पाहिजे. विनय वस्त यांनी या वेळी ‘हटायेंगे, घटायेंगे, एड्स को मिटायेंगे’ हा नारा प्रत्यक्षात उतरवून एड्सला समूळ नष्ट करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. (प्रतिनिधी)