मुंबई - राज्याच्या राजकारणातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटून वेगळा झाल्याने राजकीय उलथापालथ झाली आहे. शिंदे गटासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं असून आता, हा वाद न्यायालयात गेला. त्यातच, शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला. शिंदे गटाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यात, त्यांनी नावाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. त्यानंतरही, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टिका केली आहे.
शिवसेनेच्या नावाचा वापर करुन त्यांनी मतं मागू नयेत. त्यांनी त्यांच्या बापाचं नाव लावावं, ते स्वत: बाळासाहेबांचे भक्त म्हणतात, पण बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव देण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण, तुम्ही तुमच्या बापाचं नाव द्या, तुमच्या बापाच्या नावानं पक्ष बनवा आणि बापाच्या नावानं मतं मागा. आमच्या पक्षाचा जो बाप आहे, त्याच्या नावाने का मतं मागता. तुम्हाला तर 100 बाप आहेत तिकडं, कोणी दिल्लीत आहे, कोणी नागपुरात आहे, कोणी मुंबईत आहे, असे म्हणत राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टिका केली.
आमची निष्ठ ही केवळ बाळासाहेबांवरच आहे, आम्ही त्यांना सोडत नाही. तुम्ही 10 वेळा बाप बदलता, कधी बडोद्यात जाता, कधी सुरतला जाता, कधी गुवाहटीला जाता, कधी दिल्लीत जाता. ही बाप बदलण्याची जी प्रक्रिया आहे, ती आमच्या पक्षात नाही चालत, असे म्हणत राऊत यांनी बंडखोर आमदारांवर अतिशय बोचरी टिका केली.
तिथल्या आमदारांशी बोलणे झालं
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. तसेच, नुकतेच माझे तिथल्या काही आमदारांशी फोनवरुन बोलणे झाले. त्या आमदारांना इकडं यायचं आहे, पण त्यांना येऊ दिलं जात नाही. त्यांना जबरदस्तीने तिथं डांबून ठेवलं आहे. तरीही ते आमदार परत येतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दिपक केसरकरांचं प्रत्युत्तर
''आम्ही कोणाच्याच नावाने मतं मागितलेली नाही. आम्ही अन्य पक्षातूनही निवडून आलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून येत असते तर सगळे निवडून आले असते. उमेदवाराचंही गुडविल असतं आणि पक्षाचंही ठरावीक मतदान असतं. आजच्या विधान सभेतील किमान ७० ते ८० किंवा १०० उमेदवार कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात. आमदारांचं मतदारसंघात आणि जिल्ह्यात काम असतं,'' असे म्हणत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना उत्तर दिलं.