संजूबाबा झोपू देईना, शेजा-यांची पोलिसांकडे तक्रार
By Admin | Published: February 6, 2017 12:19 PM2017-02-06T12:19:09+5:302017-02-06T12:20:57+5:30
शेजा-यांची संजय दत्तविरोधात पोलिसांकडे तक्रार, दोन वेळेस पोलीस संजय दत्तच्या घरी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - अभिनेता संजय दत्तच्या घरात रात्री उशीरापर्यंत पार्टी चालते, मोठ्या आवाजात गाणी लावली जातात, त्यामुळे आम्हाला झोप लागत नाही अशी तक्रार संजय दत्तच्या शेजा-यांनी केली आहे. मुंबईच्या पॉली हाऊस परिसरात राहणा-या नागरिकांनी याबाबत खार पोलीस स्थानकात तक्रार केली असून दोन वेळेस पोलीस त्याच्या घरीही गेले आणि आवाज कमी ठेवण्याची सुचना त्याला देण्यात आली.
पॉली हिल रेजिडेंन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अमिताव शुक्ला यांनी सांगितले की, 14 जानेवारीला रात्री 11.30 च्या सुमारेस संजय दत्तने आपल्या घराच्या छतावर मोठ्या आवाजात गाणी वाजवायला सुरूवात केली. आवाज इतका मोठा होता की आम्हाला झोपंही लागत नव्हती. कंट्रोल रूमला फोनकरून आम्ही तक्रार केली तर महिला पोलिसाने फोनवर तक्रार घेतली पण काही कारवाई झाली नाही. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिलं आहे. आवाज कमी न झाल्याने शुक्ला यांनी रात्री 1.30 वाजता पुन्हा फोन लावून तक्रार केली. त्यानंतर 15 मिनीट वाट पाहिली आणि नंतर पोलिस स्थानकात तक्रार केली. त्यांनी आवाज कमी होईल असं वचन दिलं आणि थोड्यावेळात म्यूझीक बंद झालं. याविषयी संजय दत्तला ताकीद देणार एक पत्रंही पाठवलं मात्र, काही परिणाम झाला नाही. रेजिडेंन्स असोसिएशनच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल आणि पोलीस उपायुक्तांना संजय दत्तविरोधात कडक कारवाई करण्यास सांगितलं जाईल, असं शुक्ला म्हणाले.
जेव्हा आम्हाला तक्रार मिळाली आम्ही त्वरीत जाऊन आवाज कमी केला, पुढील कारवाई करण्याबाबत विचार केला जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव म्हणाले.