जीर्ण इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागण्यासाठी देखाव्याच्या माध्यमातून साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:06 AM2021-09-19T04:06:18+5:302021-09-19T04:06:18+5:30
मुंबई : यंदा घरगुती गणपतींचे येथे आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. या देखाव्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घालण्यात ...
मुंबई : यंदा घरगुती गणपतींचे येथे आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. या देखाव्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घालण्यात आला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी आदर्श वसाहत म्हणून विक्रोळीतील कन्नमवार नगराची ओळख आहे. या कन्नमवारनगरातील इमारती आता जीर्ण झाल्या असून या इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही अडथळ्याविना जलद गतीने व्हावा, यासाठी विक्रोळीतील रहिवासी दर्शना गोवेकर यांनी आपल्या बाप्पाजवळ देखावा उभारला आहे. कन्नमवार नगरच्या इमारतींचा विकास जलदगतीने होऊ दे, असे साकडे त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून बाप्पाला घातले आहे.
कन्नमवार नगर या म्हाडा वसाहतीतील पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे. येथे २५० हून अधिक इमारती आहेत. इमारतींची दुरवस्था झाल्याने येथे अनेकदा छत कोसळणाच्या घटना घडतात. मोजक्या इमारतींचाच पुनर्विकास झाला असून काही इमारतींचा पुनर्विकास अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. मराठी टक्का टिकण्यासाठी येथील पुनर्विकास लवकर होणे गरजेचे आहे. यासाठीच विक्रोळीतील दर्शना गोवेकर यांनी त्यांच्या घरी ''पुनर्विकास लवकर होऊ दे'' महाराजा या विषयावर देखावा साकारला आहे. पुनर्विकास लवकर होऊ दे रे महाराजा, विक्रोळी कोणी सोडून नको जाऊ दे रे महाराजा, बिघडलेली नाती पूर्ववत होऊ दे रे महाराजा असे गाऱ्हाणे या देखाव्याच्या माध्यमातून घालण्यात आले आहे.
दर्शना गोवेकर - कन्नमवार नगरमध्ये आम्ही लहानपणापासून राहतो. विक्रोळीमधील म्हाडाच्या जीर्ण इमारतींचा लवकरात लवकर पुनर्विकास होऊन सर्वांना नवीन घर मिळावे, यासाठी मी बाप्पाला देखाव्याच्या माध्यमातून प्रार्थना केली आहे. हा देखावा साकारण्यासाठी कापड, पाइप यांचा वापर केला असून या वस्तू पुन्हा वापरता येतील.