ठाणे : धोकादायक इमारतींच्या मुद्यावरून सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा गदारोळ झाला. विशेष म्हणजे एखादी इमारत धोकादायक अथवा अतिधोकादायक ठरविण्याचे कोणतेही धोरण पालिकेकडे नसल्याची गंभीर बाब या वेळी उघडकीस आली आहे. त्यातही केवळ बिल्डरांच्या हितासाठी या इमारती धोकादायक घोषित केल्या जात असल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केला. सोमवारच्या बैठकीत विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी धोकादायक इमारती घोषित करण्याची पालिकेची प्रक्रिया कशी आहे, यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सहा महिन्यांपूर्वी जी इमारत धोकादायकच्या यादीत नव्हती, ती आता धोकादायक कशी ठरविली जाते, असा सवालही उपस्थित केला. पावसाळ्यापूर्वी विशेष मोहीम घेऊन शहरातील अशा धोकादायक इमारतींची प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंत्यांकडून पाहणी केली जाते. त्यानंतर, सहायक आयुक्त त्यावर अहवाल देऊन त्या इमारती धोकादायक अथवा अतिधोकादायक ठरविल्या जात असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त के.डी. निपुर्ते यांनी दिली. परंतु, बी.ए. बी.कॉम. झालेल्या कर्मचाऱ्यांकडून आपण इमारती धोकादायक कशा ठरवू शकतो, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. यासाठी तज्ज्ञाकडून सल्ला घेतला जातो का, असा सवालही या वेळी उपस्थित झाला. परंतु, प्रत्यक्षात एखादी इमारत धोकादायक आहे अथवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार शहर विकास विभागाला असल्याची माहिती प्रदीप गोहील यांनी दिली. परंतु, याबाबत कोणतेही धोरण नसल्याची माहिती त्यांनी दिली. या उत्तराने सभागृह अवाक झाले. धोरण नसताना आपण कारवाई कशी करतो, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
बिल्डरांच्या हितासाठी चांगल्या इमारती धोकादायक ठरविल्या
By admin | Published: February 10, 2015 12:33 AM