Join us

बहिणींना सांभाळण्यासाठी ‘ती’ राहिली अविवाहित, महिला पोलिसाच्या त्यागाची ३७ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:33 AM

वडिलांच्या निधनानंतर स्वत: अविवाहित राहून घराचा डोलारा यशस्वीपणे पुढे नेणा-या कर्तबगार पोलीस अधिकारी छाया नाईक यांचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी समतानगरातील घरी जाऊन कौतुक केले.

मुंबई : वडिलांच्या निधनानंतर स्वत: अविवाहित राहून घराचा डोलारा यशस्वीपणे पुढे नेणा-या कर्तबगार पोलीस अधिकारी छाया नाईक यांचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी समतानगरातील घरी जाऊन कौतुक केले. त्यानंतर सोसायटीत झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमातदेखील त्यांनी छाया नाईक यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.छाया नाईक यांनी संपूर्ण आयुष्यच त्याग, समर्पणात व्यतित केले. स्वत: अविवाहित राहून लहान बहिणींची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. छाया यांनी पोलीस खात्यात ३७ वर्षे सचोटीने नोकरी केली. सध्या त्या मुंबई पोलीस मुख्यालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काही वर्षे त्यांनी असाध्य रोगाचा सामनाही केला; आणि दुसरीकडे पोलीस मुख्यालयातील सेवा सचोटीने त्या पार पाडत असल्याचे गौरवोद्गार आमदार सुर्वे यांनी काढले. याप्रसंगी छाया यांच्या आई सुनंदा नाईक, बहिणी, नगरसेविका माधुरी भोईर, शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, महिला शाखासंघटक सुरेखा मोरे यांची उपस्थिती होती. गाजावाजा न करता घरी येऊन छाया यांचा सत्कार केल्याने कुटुंबीयांनी आमदार सुर्वे यांचे आभार मानले.छाया यांचे वय अवघे १६ असताना पोलीस उपनिरीक्षक असलेल्या त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे लहान वयातच छाया यांच्या खांद्यावर पाच बहिणींची जबाबदारी पडली. छायाने मात्र आईला धीर देत बहिणींची जबाबदारी सांभाळण्याचे एकमेव ध्येय बाळगले. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ५४३ इतक्या मासिक वेतनावर त्या वडिलांच्या जागी पोलीस खात्यात रुजू झाल्या. बाबांचे कर्तव्य ते त्यांची इच्छा असूनही पार पडू शकले नाहीत, आता ही जबाबदारी आपण उचलायलाच हवी, असा ठाम मनोनिग्रह करून त्यांनी मार्गक्रमण सुरूच ठेवले. कोवळ्या वयात स्वाभिमानी जगणे, स्वत:वरचा दांडगा विश्वास आणि जबाबदारीची जाणीव या भावनेतूनच एक-एक करून छायाने सर्व बहिणींची लग्ने लावून दिली. लग्नानंतरचे माहेरवाशिणींचे सगळे लाड पुरवले. बहिणींची बाळंतपणं आणि त्यांच्या मुलांची बारसेही थोरल्या भावाप्रमाणे पार पाडली. शिक्षणाची आवड असलेल्या छाया यांना फक्त १२वीपर्यंतच शिकता आले. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी जिद्दीने एमएची पदवी प्राप्त केली. छाया यांना पोलीस खात्यात ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :मुंबई