Join us  

डॉक्टर दांम्पत्याने मुलाचे अवयव केले दान; पुण्याहून बंगळुरुला निघालेला, अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 7:24 AM

विरारमधील साकेत दंडवते याचे केवळ पाच महिन्यांपूर्वीच अपर्णा हिच्याशी लग्न झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पारोळ / नालासोपारा : विरारमधील साकेत दंडवते या ३० वर्षीय तरुणाचा पाच दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युपश्चात माझ्या शरीराचे अवयवदान करण्यात यावे, अशी इच्छा यापूर्वीच साकेतनेही व्यक्त केली होती. त्याची इच्छा पूर्णत्वास नेण्याचा निर्णय त्याचे आई-वडील आणि पत्नी यांनी घेतला. त्यामुळे साकेतचा मृत्यू हा अन्य ११ जणांना जगण्याची नवी उमेद देणारा ठरला आहे.

पाच महिन्यांचा संसारविरारमधील साकेत दंडवते याचे केवळ पाच महिन्यांपूर्वीच अपर्णा हिच्याशी लग्न झाले होते; मात्र अचानक संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपर्णा हिने आपले दुःख बाजूला ठेवून पतीच्या अवयवदानाचा घेतलेला निर्णय सर्वांसाठी आदर्श असाच आहे.

साकेतचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आदी अवयवांचे दान करण्यात आले असून, त्यासाठी साकेतचे आई, वडील या दोघांनीही पुढाकार घेतला. थोरल्या मुलाच्या मृत्युपश्चात त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेणाऱ्या विनीत व सुमेधा दंडवते या डॉक्टर दाम्पत्याने समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. साकेत हा बंगळरू येथील ओके क्रेडिट कंपनीत नोकरीला होता. पुण्यावरून १३ मे रोजी बंगळुरू येथे दुचाकीवरून जात असताना, त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्याला बसवराज आप्पा मेडिकल रुग्णालयात दाखल केले होते; मात्र मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्य झाला.

कोरोनात पाच लाख नागरिकांचा मृत्यू झाला; मात्र यासाठी सरकारने लसीकरणासारखी कोट्यवधी रुपये खर्च करून मोहीम राबविली; पण भारतात रस्ते अपघातात दरवर्षी दोन ते अडीच लाख लोकांच मृत्यू होत असल्याने सरकारने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. -डॉ. हेमंत जोशी, सामाजिक कार्यकर्ते, विरार 

टॅग्स :अवयव दान