लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली असून, लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. मृत पीडितेच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आणि शासनाच्या विविध योजनांमधून २० लाखांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाच्या ॲट्रॉसिटीच्या कलमाचाही दाखल गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे नगराळे यांनी सांगितले. आरोपीने गुन्हा कबूल केला असून, तो २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. पोलिसांच्या हाती सर्व पुरावे लागले आहेत. गुन्ह्यात वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळावर पीडित महिला कधी आली? आरोपी कधी आला? गुन्हा कसा घडला? त्यानंतर आरोपी कसा पळून गेला? या सगळ्याची पुराव्यासह माहिती मिळाली आहे. या सर्व घटनाक्रमाचे डिजिटल स्वरूपातील पुरावे तयार करण्यात आले आहेत. येेत्या १५ दिवसांत तपास पूर्ण करून महिनाभरात आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही नगराळे म्हणाले.
पीडितेच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर बैैठक होऊन त्यात या प्रकरणावर चर्चा झाली.
- मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून पीडित महिलेच्या तीन मुलींना २० लाखांची मदत दिली जाणार आहे. इतर शासकीय योजनांतूनही अधिकाधिक मदत केली जाईल, असे नगराळे यांनी सांगितले.