मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावू लागलेली मेट्रो रेल्वे साकीनाका, मरोळ नाका आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुखद दिलासा देत आहे. या मेट्रोतून अंधेरी आणि घाटकोपरनंतर साकीनाका व विमानतळ या दोन स्थानकांवर चढउतार करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. कारण या परिसरात अनेक कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आहेत.साकीनाका हे जंक्शन सर्वांत मोठे असून, येथून अंधेरी, पवई, आरे कॉलनी आणि कुर्ला रेल्वे स्थानकाकडे प्रवाशांना येता येते. शिवाय साकीनाका या मेट्रो रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पवई आणि कुर्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा आणि बेस्ट बस प्रवाशांना उपलब्ध आहेत. ज्या प्रवाशांना पवई गाठायचे आहे; अशा प्रवाशांना मेट्रोचे साकीनाका हे स्थानक उपयोगी पडत असून, मेट्रो सुरू झाल्यापासून साकीनाका मेट्रो रेल्वे स्थानकाखाली रिक्षावाल्यांचा रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. रिक्षावाल्यांच्या रांगांचा उर्वरित वाहनांना त्रास होत असला तरी रिक्षावाल्यांसाठी हे जंक्शन अधिक लाभदायक झाले आहे.तर मरोळ नाका या मेट्रोच्या रेल्वे स्थानकांहून प्रवाशांना येथील बाजारपेठा सहज गाठता येतात. विशेष म्हणजे मरोळ नाका या परिसरात अनेक कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यामुळे घाटकोपर आणि अंधेरीहून मेट्रोने मरोळ नाका या मेट्रो रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. विशेषत: कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये येथे असल्याने चाकरमानी येथे मोठ्या प्रमाणावर उतरत असल्याचे चित्र आहे. मरोळ नाका या मेट्रो स्थानकालगत असणारी कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये हाकेच्या अंतरावर आहेत. परिणामी या मेट्रो स्थानकाखाली मात्र रिक्षावाल्यांना थारा नाही. किंवा ते येथे थांबत नाहीत. कारण येथे त्यांना कॉर्पोरेट कंपन्यांचा कर्मचारी ग्राहक म्हणून मिळतच नाही.याच मार्गावरील विमानतळ हे अधिक मोक्याचे मेट्रो स्थानक आहे. अंधेरीहून विमानतळ या मेट्रो स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या स्थानकाखाली मात्र रिक्षावाल्यांची भलीमोठी रांग आहे. मुळात येथील नाक्यावर पूर्वीपासूनच रिक्षांची भलीमोठी रांग लागत होती. आता तर मेट्रो सुरू झाल्यापासून रिक्षांची संख्या वाढू लागली आहे. परंतु येथून विमानतळाकडे जाणाऱ्या ग्राहकांकडून रिक्षावाले पैसे उकळत आहेत. विमानतळ मेट्रो रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांकडून रिक्षाचालक मीटरनुसार पैसे घेत नाहीत; तर संबंधित प्रवाशांना लमसम आकडा सांगतात. एखाद्या प्रवाशाला हे लमसम भाडे परवडणारे असेल तरच तो रिक्षाचा आधार घेतो अथवा अनेक प्रवासी येथून विमानतळाकडे जाण्यासाठी बेस्ट बसचाच आधार घेताना दिसतात. (प्रतिनिधी)
साकीनाका, विमानतळ स्थानक वर्दळीचे
By admin | Published: June 13, 2014 1:54 AM