साकीनाका बलात्कारप्रकरण; पीडितेच्या कुटुंबाला आरपीआयकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:30+5:302021-09-21T04:06:30+5:30
मुंबई : साकीनाका बलात्कारप्रकरणातील बळी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास ...
मुंबई : साकीनाका बलात्कारप्रकरणातील बळी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.
साकीनाका उदयनगर येथील बळी पडलेल्या महिलेच्या निवासस्थानी जाऊन आठवले यांनी आर्थिक मदत दिली. यावेळी बळी पडलेल्या महिलेची आई आणि दोन मुली उपस्थित होत्या. तसेच रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, साधू कटके आदी उपस्थित होते. साकीनाका येथे १० सप्टेंबरला एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक केली. तसेच ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने बळी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाला समाजकल्याण खात्यातर्फे आठ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. सरकारच्या वतीने मुख्यमंत्री निधीतून मदतीची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याने कुटुंबाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
जलदगती न्यायालयात खटला चालवा
या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. तसेच बळी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाला राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून घर देण्यासाठी निर्णय घ्यावा, त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.