लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साकीनाकातील घटना अत्यंत दुर्दैवी असून, आरोपीला शिताफीने अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास महिला सहायक आयुक्तांकडून एक महिन्याच्या आत पूर्ण करून त्याला कठोर शासन देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शनिवारी दिली.
घटनेबाबत माहिती देताना ते म्हणाले की, कंपनीच्या सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व टेम्पोच्या नंबरवरून आरोपीचा शोध घेण्यात आला. तो अन्यत्र पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पकडले असून, रक्ताळलेले कपडे जप्त केले आहेत. मोहन चौहानला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास डी. एन. नगर विभागाच्या सहायक आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
-----------------------------
नराधम मोहन चौहान हा मूळचा उत्तर प्रदेश जौनपूरचा आहे. तो टेम्पो चालवित असून, कचरा टाकण्याचे काम करतो. दारूचे व्यसन असून तो नशेत रस्त्यावर झोपतो. त्याचा भाऊ व चुलत बहीण मुंबईत राहत असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
----------
पीडितेचा जबाब नाही
महिलेवर बलात्कार केल्यानंतर मोहनने तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालून अमानुषपणे मारहाण केली होती. रक्तस्राव झाल्याने बेशुद्ध पडली होती. त्यामुळे पोलिसांना तिचा जबाब नोंदविता आला नाही. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुमारे ३३ तासांनंतर तिचा मृत्यू झाला. या कालावधीत ती बोलण्याच्या स्थितीत नसल्याने नेमका अत्याचार कसा, का व किती जणांनी केला, याचा उलगडा तिच्या तोंडातून अखेरपर्यंत समजू शकला नाही. आता तांत्रिक पुरावे, विशेषतः सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार व अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास पूर्ण केला जाणार आहे.
-------
गुन्ह्यातील ३४ कलम काढून टाकले
पीडितेवरील अत्याचार लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला एकाशिवाय अन्य आरोपी असण्याच्या शक्यतेने भादंवि ३७६, ३०७ व ३४ कलम लावण्यात आले होते. तिचा मृत्यू झाल्यानंतर ३०७ ऐवजी हत्येचे ३०२ हे कलम लावण्यात आले. तर, नराधम मोहन चौहान हा एकट्यानेच हे कृत्य केल्याचे सुरक्षारक्षकाचा जबाब व सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. दुसरा आरोपी नसल्याने गुन्ह्यातील ३४ कलम काढून टाकण्यात आले.