सलाडही महागले, थंडीतही भाज्यांना ‘गरमी’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 09:55 AM2024-01-20T09:55:41+5:302024-01-20T09:57:28+5:30
काकडी, बीटचे वाढले दर कांदे, टाेमॅटाे स्थिरावले,भाज्यांची आवक कमी झाल्याचा परिणाम.
मुंबई : बाजारात भाज्यांची आवक कमी असल्याने काही ठराविक भाज्यांचे दर शंभरीपार गेल्याचे चित्र आहे. लसूण तर ४०० रुपये किलोच्या खाली यायला तयार नाही. काकडी-बीटचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटातले सलाडही महागले आहे. त्यातल्या त्यात टोमॅटो, गाजर, हिरवा वाटाणा यांच्या किमती आवाक्यात आहेत.
अनियमित पावसाचा परिणाम भाजीपाल्यांच्या शेतीवर झाल्याने यंदा थंडीच्या मोसमातही भाज्यांची आवक तुलनेत कमी आहे. एरवी थंडीत भाज्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. आवक कमी असली तरी काही भाज्यांच्या किमती स्थिर आहेत.
अनियमित पावसामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी आहे. मात्र, मालाचा दर्जा तुलनेत चांगला आहे. काही भाज्या महाग झाल्या आहेत. परंतु कांदे-बटाटे, टोमॅटो तुलनेत स्वस्त आहेत. - संतोष लोंढे, भाजीविक्रेते, बोरीवली (पूर्व)
हे आवाक्याबाहेर :
भाज्या प्रति किलो दर
लसूण ४००
आले १६०
गवार १२०
पावटा १२०
तुरीच्या शेंगा १२०
भेंडी १००
काकडी ८०
तुरीच्या शेंगा, पावटा या काही भाज्या १०० ते १२० किलोच्या आसपास आहेत. चांगल्या दर्जाची गवार, भेंडी या भाज्याही शंभरावर गेल्याचे गेल्या आहेत.
भाज्यांचा त्यातल्या त्यात चांगला दर्जा ही समाधानाची बाब. ३० रुपये किलोच्या आसपास असलेले बटाटे, ४० च्या आसपास असलेले कांदे यामुळेही काहीसा दिलासा आहे. एरवी ४० रुपये किलोच्या आसपास मिळणारा बीट आता ६० रुपयांवर गेला आहे.
४० रुपयांच्या आसपास असलेली काकडी ८० रुपये किलोवर गेली आहे. हिरवा वाटाणा स्वस्त म्हणजे ३० ते ६० रुपयांच्या (दर्जानुसार) आसपास विकला जात आहे.