मनोहर कुंभेजकरमुंबई : मुंबई महानगर पालिकेचा बायोमेट्रिक हजेरीचा उद्देश स्तुत्य आहे आणि त्यामुळे कर्मचारी वेळेवर उपस्थित होतो. परंतु ज्या ठिकाणी नेटवर्क नाही अशा ठिकाणी त्यांची सही असलेली उपस्थिती केवळ प्रशासनाच्या बायोमेट्रिक हजेरीच्या नियमानुसार त्याच्या मॅन्युअल एंट्री न केल्यामुळे त्याचा पगार न देणे हे त्याचे खच्चीकरण करण्यासारखं आहे.
आरे कॉलनीच्या पालिकेच्या शाळा संकुलातील कार्यरत असणाऱ्या सर्व 60 शिक्षक कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही. त्यासाठी पत्रव्यवहार करूनही त्याची योग्य ती दखल अद्याप घेतली नाही. सदर शाळा दुर्गम भागातील असून येथे बायोमेट्रिक हजेरीसाठी बसविलेले मशीन या ठिकाणी नेटवर्क नसल्याने हजेरी पुस्तकावर नोंदवली जाते. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्षित केले जात आहे. येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे वेतन रखडले असून ते मिळविण्यासाठी वारंवार खेटे घालावे लागत आहे. सदर संकुलातील शिक्षक वर्ग प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असून वंचित घटकांसाठी काम करीत असलेल्या आदिवासी पाड्यामध्ये काम करणार्या शिक्षकांना वेळच्या वेळी पगार दिला जात नाही. भूमिगत केबल इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून नंतर देता त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. गृह कर्जाचे व शैक्षणिक कर्जाचे हप्ते व घर चालवणे या सर्व खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे. संबंधित वेतनाची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी, पी/दक्षिण यांच्याकडे असताना त्यांनी ती पूर्ण झटकली आहे. येथील 60 कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे, असा आरोप येथील शिक्षकांनी लोकमतशी बोलतांना केला.
या प्रकरणी पी दक्षिण विभागाच्या शिक्षण विभागाच्या साहाय्यक प्रशासकीय अधिकारी निशा यादव यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी सांगितले की,आपण या प्रकरणी पाठपुरावा केला आहे.येथील शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनाच्या मंजूरीची फाईल पालिका आयुक्तांकडे आहे.मजुरी मिळाल्यावर लवकर त्यांना वेतन मिळेल. येथील पालिका शाळा ही दुर्गम भागात असल्याने येथे इंटरनेटची सुविधा पोहचत नाही.परिणामी जो पर्यंत येथे इंटरनेट सुविधा मिळत नाही,तोपर्यंत येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांची पटलावरील हजेरी ग्राहय धरण्यात यावी या आपल्या प्रस्तावाला पालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी मंजुरी दिली आहे.त्यामुळे येथील शिक्षकांचे पगार आता यापुढे रखडणार नाही असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.