बेस्ट कामगारांना मिळणार १५ तारखेपर्यंत पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:23 AM2018-03-14T03:23:38+5:302018-03-14T03:23:38+5:30
गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यासाठी १० तारखेच्या आत पगाराचे आश्वासन बेस्ट प्रशासनाने दिले खरे. मात्र हा शब्द काही त्यांना पाळता आलेला नाही.
मुंबई : गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यासाठी १० तारखेच्या आत पगाराचे आश्वासन बेस्ट प्रशासनाने दिले खरे. मात्र हा शब्द काही त्यांना पाळता आलेला नाही. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी अद्याप फेब्रुवारी महिन्याच्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. याचे तीव्र पडसाद उमटत बेस्ट समितीची सभाच तहकूब करण्याचा इशारा बेस्ट समिती सदस्यांनी मंगळवारी दिला. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेच्या आत पगार देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
बेस्ट कामगारांना वेळेत पगार मिळत नसल्याने भाजपा सदस्य सुनील गणाचार्य यांनी सभा तहकुबीची सूचना मांडली. त्यांच्या तहकुबीला पाठिंबा देताना सुहास सामंत यांनी पालिका आयुक्त आपला संबंध बेस्टशी नसल्याचे सांगत असतील, तर त्यांनी सुधारणा करण्याच्या सूचना कुठल्या अधिकारात दिल्या, असा सवाल केला. या चर्चेला उत्तर देताना बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी आपण आयुक्तांनी सुचविलेल्या सूचना मान्य केल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याचे स्पष्ट केले.
>खासगीकरण
होणार नाही
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे कुठल्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ नये, या मताचे आपण आहोत. खासगी गाड्या भाड्याने घेतल्या जात असल्या तरी त्यावर बेस्टचेच वर्चस्व राहणार असल्याची ग्वाही बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली. त्यांच्या विनंतीनुसार तहकुबीची सूचना मागे घेण्यात आली.