लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४५ टक्के वेतनावर काम करावे लागत आहे. मात्र, आता बरेच महिने उलटूनही या कर्मचाऱ्यांची वेतन कपात अद्यापही सुरूच आहे. व्यवस्थापनाचा या कारभारावर हे सर्व कर्मचारी अत्यंत नाराज असून, आता ही संस्था सरकारनेच आपल्या ताब्यात घेऊन चालवायला घ्यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. मागील वर्षभरापासून ४५ टक्के वेतनावर काम करावे लागत असल्याने, या सर्व कर्मचाऱ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये नैराश्याची भावना पसरत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दी एशियाटिक सोसायटी ऑफ कोलकाताप्रमाणे एशियाटिक सोसायटी मुंबईलाही महत्त्वाच्या संस्थेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने होत आहे.
सध्याच्या व्यवस्थापनाचा मनमानी कारभार सुरू आहे. व्यवस्थापनाने आमचे थकित वेतन देऊन आम्हाला सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे आश्वासनही द्यावे. ही संस्था सरकारने चालवायला घेतल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल. त्याचप्रमाणे, सतत आंदोलनाची वेळही येणार नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.