एसटी कर्मचा-यांचे पगार मागील सरकारमुळे कमी, त्यांच्या नावे बोंब मारा - दिवाकर रावते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 04:07 PM2018-01-06T16:07:59+5:302018-01-06T17:11:25+5:30
मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार 'गणवेश वितरण सोहळा' व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन तयार 'गणवेश वितरण सोहळा' व विविध नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण कार्यक्रम पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक हे उपस्थित आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार मागील सरकारमुळे कमी आहेत, त्यांच्या नावानं बोंब मारा, असं विधान यावेळी दिवाकर रावते यांनी केले आहे.
पुढे रावते असंही म्हणाले की, 'टीका करणे सोपे मात्र निर्मिती अवघड आहे. एसटी महामंडळ परिवर्तनाच्या स्पर्धेत उतरले आहे. स्पर्धेत शिवशाही यशस्वी घोडदौड सुरू आहे. ज्या लोकांना वातानुकूलित सेवा परवडत नाही त्यांनी शिवशाही पाहून समाधान व्यक्त केले आहे. काळासह डबल आवश्यक म्हणून लाल डब्याची एसटी आधुनिक आणि वातानुकूलित सेवा सुरू केली आहे'.
मार्च अखेर राज्यातील सर्व कर्मचा-यांना गणवेश मिळणार
स्थानक प्रमुख, एसटी कार्यशाळा अधीक्षक, एसटी कार्यशाळा प्रभारक, हेड आर्ट, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक, एसटी देखभाल करणारे अधिकारी, एसटी देखभाल करणारे कर्मचारी, वाहतूक नियंत्रक, शिपाई, एसटी सहायक (मकेनिक), या संवर्गातील प्रत्येकी पाच प्रतिनिधीला गणवेश वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दहा चालक आणि ५ पाच महिला वाहक व ५ पुरुष वाहक यांना गणवेश वाटप करण्यात आले. राज्य भरातील एक लाख ८४५ कर्मचारी अधिकारी वर्गाला मार्च अखेर गणवेश मिळणार आहे, अशी माहिती एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.
आज कर्तव्यपूर्ती सोहळा : उद्धव ठाकरे
पत्रकार दिन, ममता दिन यांचे औचित्य म्हणून आज कर्तव्यपूर्ती सोहळा आहे. एसटी लाल डब्याचे परिवतर्न होत आहे, यामुळे एसटीमध्ये परिवर्तन होते. गेली दिवाळी ही बेस्ट, जीएसटी, एसटी या प्रश्नांनी गाजली. रावते यांनी उत्तम योजना मांडल्या आहेत. कर्मचा-यांच्या वेतनासाठीदेखील त्यांनी प्रयत्न करावेत. एसटीत शिवशाही आणली एसटी कारभारातदेखील शिवशाही आणली पाहिजे. पर्यटकांना एसटीची कुतूहल निर्माण करणारी एसटी तयार करा.