लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज कुंद्रा याने त्याच्या कंपनीचा आयटी तज्ज्ञ रायन थॉर्प याच्या मार्फत प्रतिकेश आणि ईश्वर या दोघांना विआन इंडस्ट्रीजच्या पगारावर हॉटशॉट ॲप मॅनेज करण्याकरिता नेमून दिले होते, असे तपासात समोर आले आहे. हॉटशॉट संबंधित कंपनीतून कुंद्राच्या राजीनाम्यानंतर रायन सर्व माहिती घेत होता. याबाबत मालमत्ता कक्ष अधिक तपास करीत आहे.
विआन इंडस्ट्रीज केनरीन प्रायव्हेट लिमिटेडला ॲपच्या देखभालीसाठी महिन्याला २ ते ३ लाख देत होती. कुंद्रा याने या ॲपवरील पायरसीवर लक्ष ठेवण्यासाठी मनन वोरासोबत ॲव्हेलोंज टेक्नॉलॉजी ही कंपनी स्थापन केल्याचेही उमेश कामतने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाह यांनी भागीदारीत आर्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली होती. याच कंपनीमार्फत हॉटशॉटचे कामकाज सुरू होते. ११ डिसेंबर २०१९ रोजी राज कुंद्रा याने या कंपनीचा राजीनामा दिला. त्यानंतर संजय त्रिपाठी हे या कंपनीचे भागीदार झाले होते. या प्रकरणात त्रिपाठीही साक्षीदार झाले आहेत, तसेच अन्य साक्षीदार सौरभ कुशवाह यांनी दिलेल्या जबाबात कुंद्रा याने राजीनामा दिल्यानंतर कंपनीचा कर्मचारी रायन थॉर्प हा हॉटशॉट ॲपबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेने दोघांना साक्षीदार बनवीत या प्रकरणातील महत्त्वाचे चॅट, बँक व्यवहार, व्हिडिओ ताब्यात घेतले आहेत. पथक यातील अन्य आरोपींचा शोध घेत आहे.
कुंद्रा याचे व्हॉट्सॲप चॅट व्हायरल
कुंद्रा याची पोलीस कोठडीत रवानगी होताच त्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात प्रदीप बक्षीसोबत आर्थिक व्यवहार, कलाकारांच्या रखडलेल्या पैशांचाही उल्लेख आहे. यात एकूण ८१ कलाकारांचे पैसे देण्याचे बाकी राहिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.