आँक्टोबर महिन्यांतील खरेदी विक्रीचा विक्रम
मुंबई : गगनाला भिडणा-या इमारती आणि त्यापेक्षाही जास्त उंचीवर पोहचलेल्या घरांचे भाव ही दक्षिण मध्य मुंबईची खास ओळख. आता उच्चभ्रूंच्या या वसाहतींमधिल घरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहारसुध्दा आकाशाला गवसणी घालू लागले आहेत. गेल्या वर्षी आँक्टोबर महिन्यांत इथे १५० कोटींच्या घरांची विक्री झाली होती. यंदा तो आकडा ५०० कोटींवर झेपावला आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत आणि कमी झालेल्या घरांच्या किंमती ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.
प्रति चौरस फुटांसाठी ५० हजार ते एक लाखापर्यंतचा दर असलेल्या वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, ताडदेव, लोअर परेल या परिसरांतील घरांच्या किंमती ऐकल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारतात. मुंबईतील उच्चभ्रूंच्या आवाक्यात असलेल्या इथल्या घरांची सरासरी किंमत चार कोटींपेक्षा जास्त आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात इथल्या गृह खरेदीला घरघर लागली होती. सर्वच आघाड्यांवर आर्थिक कोंडी निर्माण झाल्यामुळे या आलिशान घरांच्या विक्रीला लागलेले ग्रहण सुटेल की नाही अशी भीती विकासकांना होती. मात्र, आँक्टोबर महिन्यांतील घरांच्या खरेदी विक्रीच्या विक्रमी व्यवहारांमुळे त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २३० टक्क्यांनी हे व्यवहार वाढल्याचे निरीक्षण अँनराँक प्राँपर्टी या सल्लागार संस्थेने आपल्या अहवालात नोंदविले आहे.
उत्सवाच्या काळात विकासकांनी दिलेल्या आकर्षक आँफर्स, मुद्रांक शुल्कातील सवलत, ओसी मिळालेल्या इमारतीतली तयार घरांची उपलब्धता ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. त्याशिवाय या घरांच्या खरेदीसाठी इच्छूक असलेल्या श्रीमांतांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचे कमी चटके सोसावे लागले. तेही घरांची मागणी वाढण्यामागचे कारण असल्याचे अँनराँक प्राँपर्टीजच्या अनुज पूरी यांनी सांगितले.
११०० घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत
गेल्या वर्षी दक्षिण मध्य मुंबईतील ११,८७० घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत होती. यंदा त्यात घट झाली असून ती संख्या ११,३०० इतकी आहे. त्यापैकी १० टक्के म्हणजेच सुमारे ११३० घरे ही रेडी टू मूव्ह इन म्हणजेच बांधकाम परवाना मिळालेल्या इमारतीत आहेत. २०१७ साली ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या घरांची संख्या ८,३५० होती.