रोगप्रतिकारकशक्ती बळकट करणाऱ्या खऱ्या इंजेक्शनच्या नावाखाली बनावट इंजेक्शन बाजारात बिनदिक्कतपणे विकली जात आहेत. ही बनावट इंजेक्शन्स पंजाबमधूनमुंबईसह संपूर्ण राज्यात आयात केली जात आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि मुंबईच्या गुप्तचर विभागाने जळगावात केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला आहे. एफडीए आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. शरिराची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लोबुसल इंजेक्शनच्या नावाखाली बनावट इंजेक्शन विकल्याची घटना समोर आली आहे. या इंजेक्शनचा निर्माता मेसर्स इंटास फार्मास्युटिकलच्या तक्रारीवरून एफडीएच्या इंटेलिजन्स डिव्हिजन युनिटने या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. एफडीएचे आयुक्त परिमल सिंग यांच्या मार्गदर्शनानुसार जळगावात कारवाई करण्यात आली आहे. चाळीसगाव, जळगाव येथे एफडीएच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घाटे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मेसर्स जोगेश्वरी फार्मावर छापा टाकला. या छाप्यामध्ये बनावट इंजेक्शनच्या २२० शिशांसह इतर औषधे जप्त करण्यात आली आहेत. तपासादरम्यान ही सर्व इंजेक्शन चंदीगड येथून आयात केल्याचे निष्पन्न झाले. जोगेश्वरी फार्मा ही इंजेक्शन्स मेसर्स डेराबस्सी, पंजाब येथून घेत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
बनावट इंजेक्शन श्रीक्रीधा इंटरनॅशनल हेल्थकेअरलाही बिलाविना विकण्यात आले. एफडीएचे आयुक्त परिमल सिंग यांनी सांगितले, ही सर्व इंजेक्शन्स कोणत्याही बिलाशिवाय मोठ्या प्रमाणात पुरवली जात होती. जळगावात आयात केल्यानंतर ही बनावट इंजेक्शन मुंबईसह राज्यात आणि इतर राज्यांतही बिलाविना पुरवली जात होती. ज्या औषध विक्रेत्यांकडे औषध विक्रीचा परवाना नाही, त्यांनाच हे इंजेक्शन दिले जात होते. याप्रकरणी एफडीएने जोगेश्वरी फार्माचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके आणि श्रीक्रीधा इंटरनॅशनल हेल्थकेअरचे मालक सुनील ढाल यांच्याविरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.