Join us

शौचालयातून होतेय अमली पदार्थाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 6:01 AM

गेल्या आठवड्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) १२९ किलो एमडीचा साठा जप्त करत केलेल्या कारवाईतून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

मुंबई : गेल्या आठवड्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) १२९ किलो एमडीचा साठा जप्त करत केलेल्या कारवाईतून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यात शौचालयातून या अमली पदार्थाची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या हाती लागताच, त्यांनी वांद्रे येथील एका शौचालयात लपवून ठेवलेल्या अडीच किलो एमडीचा साठा जप्त केला आहे.एटीएसच्या विक्रोळी कक्षाला ९ सप्टेंबर रोजी एमडीचा मोठा साठा शहरात येणार, अशी माहिती मिळाली. त्यानुसार, सापळा रचून जितेंद्र परमार उर्फ आसीफ, नरेश मस्कर, अब्दुल रझाक, सुलेमान शेख आणि इरफार शेख यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत वलप गावातील एमडीच्या कारखान्याबाबत पथकाला सुगावा लागला. तेथे छापा टाकून १२० किलो तयार एमडीचा साठा पथकाला सापडला. यात बड्या कंपन्यांप्रमाणे अद्यायावत यंत्रसामुग्री आणि रसायनेही पथकाच्या हाती लागली, तसेच कारखान्यात दडवून ठेवलेली एक कोटी चार लाख रुपयांची रोकडही सापडली. सर्व साहित्य, रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याचे एटीएसने स्पष्ट केले होते. त्यांच्या चौकशीत आणखीन एका आरोपीला सांगली येथून अटक करण्यात आली. सरदार पाटील असे आरोपीचे नाव असून, तो बीएससी पदवीधर आहे.या कारवाईबरोबर एटीएसने किरकोळ विक्री करणाऱ्यांवरही वॉच ठेवला. चौकशीत काही विक्रेत्यांनी झोपडपट्टी विभागातील विविध शौचालयांमध्ये अमली पदार्थ दडवून ठेवल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे.त्यानुसार, त्यांनी वांद्रे येथील एका शौचालयातून अडीच किलोचा एमडी साठा जप्त केला असून, त्याची किंमत एक कोटी आहे. या मंडळींनी शौचालयांची साफसफाई करणाऱ्यांनाच हाताशी धरल्याचा संशय एटीएसला आहे. यात, काही कंत्राटदारही सहभागी आहेत. शौचालयात विक्री करताना कुणाचेही लक्ष जात नसल्याने, त्यांनी हा मार्ग निवडल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे.>परमार मुख्य सूत्रधार...जितेंद्र परमार उर्फ आसीफ हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजते. परमारने वलप गावात एमडीसाठी कारखाना सुरू केल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. यात सांगली येथून अटक केलेला सरदार पाटील एमडी तयार करण्याची रासायनिक प्रक्रिया करत असे.>अशी होत असे विक्री...कारखान्यात तयार झालेले एमडी मुंबईसह राज्यभरातील वितरकांना विकण्यात येत असे. यात परमारसह त्याचा पसार साथीदारावर ही जबाबदारी होती. त्यानंतर, वितरकांकडून हा साठा किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असे. पुढे नशेखोरांकडून हे ग्राहकांपर्यंत पोहोचविले जात असे.