लॅबच्या मुळ अहवालात फेरफार : दुकली गुन्हे शाखेच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॅबच्या मुळ अहवालात फेरफार करून अवघ्या हजार रुपयांत कोरोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल तयार करून देणाऱ्या दुकलीला मंगळवारी गुन्हे शाखेने अटक केली. राशीद शकील शेख (३२), बिलाल फारुख शेख (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीची नावे असून, त्यांच्याकडे पाेलीस अधिक तपास करत आहेत.
मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगेश्वरी, कुलाबा प्लॉट येथे काही जण मोबाइल व लॅपटॉपच्या सहाय्याने काेराेना रुग्णांना बनावट अहवाल तयार करून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१०चे सहायक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली हाेती. त्यानुसार पोलीस उपायुक्त अकबर पठाण, प्रभारी पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून कारवाई केली. तेव्हा राशीद आणि फारुख बनावट अहवाल देताना सापडले.
यापैकी एकजण वेलनेस लॅबमध्ये लॅब असिस्टंट म्हणून, तर दुसरा ट्रॉमा केअर रुग्णालयात कम्प्युटर असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. एकाने डीएमएलटीची पदवी घेतली असून, दुसरा बारावी पास आहे. दोघेही कृष्णा आणि लाइफ केअर डायग्नोस्टिक लॅबच्या मूळ अहवालात मोबाइल व लॅपटॉपच्या मदतीने फेरफार करून बनावट निगेटिव्ह काेराेना अहवाल तयार करून देत होते. दोघेही जोगेश्वरीचे रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली.
* पाॅझिटिव्ह असूनही निगेटिव्ह अहवालाची मागणी
अटक दुकली बनावट अहवाल व्हॉट्सॲप करुन गुगल पेवरून पैसे स्वीकारत होते. मुंबई बाहेर तसेच गावी जाण्यासाठी कोरोना अहवालाची आवश्यकता असल्यामुळे अनेक मंडळी पॉझिटिव्ह रिपोर्ट असतानाही या दुकलीकडून निगेटिव्ह अहवाल तयार करून घेत असल्याचे समाेर आले आहे. त्यांनी आतापर्यंत किती जणांना अशाप्रकारे अहवाल दिले, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
.........................