गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून एकाला अटक; ४ लाख ७० हजारांचे रेग्युलेटर हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नामांकित कंपन्यांच्या बनावट रेग्युलेटरची विक्री करणाऱ्या एकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष २ ने ही कारवाई केली असून यात जवळपास साडेचार लाखांचे रेग्युलेटर हस्तगत करण्यात आले.
मुंबईतील धोबी तलाव परिसरात एक जण दुकानात भारत गॅस, हिंदुस्तान गॅस आणि लुबना या नामांकित कंपन्यांच्या बनावट रेग्युलेटरची विक्री करत असल्याची माहिती कक्ष २ चे प्रमुख राजू कसबे यांना मिळाली हाेती. त्यानुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सहायक व्यवस्थापकांसोबत कसबे यांनी तेथे धाड टाकली. तेव्हा त्यांना हिंदुस्थान पेट्रोलियम नावाचे ५०, हिंदुस्थान पेट्रोलियमचे १५० व लुबना कंपनीचे १५० तर भारत गॅसचे ६५० असे सुमारे ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे एकूण १ हजार रेग्युलेटर त्याच्या दुकानात सापडले. आरोपी हे रेग्युलेटर महाराष्ट्राबाहेरील व्यापाऱ्याकडून बनवून घेत हाेते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून त्याची विक्री करत असल्याचेही कसबे यांना समजले. सर्व रेग्युलेटर ताब्यात घेण्यात आले असून अटक आराेपीची अधिक चौकशी सुरू आहे.
......................................