मध्य रेल्वे मार्गावर लिंबू सरबतऐवजी लिंबू सोडा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 03:03 AM2019-06-28T03:03:31+5:302019-06-28T03:03:55+5:30

कुर्ला स्थानकावर अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनविणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने तातडीने लिंबू सरबत व इतर सरबते बंद केली.

Sale of lemon soda instead of lemon syrup on the Central Railway route | मध्य रेल्वे मार्गावर लिंबू सरबतऐवजी लिंबू सोडा विक्री

मध्य रेल्वे मार्गावर लिंबू सरबतऐवजी लिंबू सोडा विक्री

Next

मुंबई  - कुर्ला स्थानकावर अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनविणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने तातडीने लिंबू सरबत व इतर सरबते बंद केली. मात्र, आता रेल्वे स्थानकावर लिंबू सरबताऐवजी लिंबू-सोडा विकला जात आहे. त्यामुळे पुन्हा प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा नाराजीचा सूर अनेक प्रवाशांमध्ये आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर लिंबू-सोडा विकला जात आहे. पावसाळ्यामध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. यात लिंबू-सोड्याची विक्री करून आजारांना आमंत्रण देण्याचा प्रकार रेल्वे स्थानकावर सुरू आहे.

२६ मार्च, २०१९ रोजी कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ आणि ८ वरील फलाटावरील लिंबू सरबत विक्रेत्याने अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवत असताना, एका प्रवाशाने याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर, मध्य रेल्वे प्रशासनाने या स्टॉलला टाळे ठोकले. मध्य रेल्वे मार्गावरील २४४ स्टॉलवरील लिंबू सरबतासह काला खट्टा, आॅरेंज ज्यूस बंद करण्यात आलेत.

व्हिडीओ व्हायरल झालेल्या त्या लिंबू सरबताची तपासणी केली असता, प्रवाशांना न्यूमोनिया, मूत्राशयाचा संसर्ग होण्याची शक्यता होती. या तपासणीत ई-कोलाय हे जीवाणू जास्त प्रमाणात आढळून आले. या जीवाणूमुळे प्रवाशांना अतिसार, ताण या बाबी होण्याची शक्यता होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने या विक्रेत्याकडून पाच लाखांचा दंड वसूल करून, त्यानंतर स्टॉल पुन्हा सुरू केला. दरम्यानच्या काळात आता मध्य रेल्वे मार्गावर लिंबू सरबताऐवजी लिंबू-सोडा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. शिवाय रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने, आता पुन्हा स्थानकांवर लिंबू सरबत विक्रीही सुरू होईल, अशी शक्यता प्रवाशांकडून वर्तविण्यात येत असून, यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी, अशी मागणी जागरूक प्रवाशांकडून होत आहे.

Web Title: Sale of lemon soda instead of lemon syrup on the Central Railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.