ई-कॉमर्स कंपन्यांकडून अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:42+5:302021-05-05T04:08:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. मात्र, ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूही ऑनलाईन विकत आहेत. सरकारच्या आदेशाचे हे उल्लंघन आहे. ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देऊ नये असे फेडरेशन ऑफ रिटेल अँड ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने म्हटले आहे.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह म्हणाले की, वाढते कोरोना रुग्ण पाहता महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन लावले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू आहेत. मात्र, अत्यावश्यक नसणाऱ्या दुकानांना टाळे लावण्यात आले आहे. असे असताना ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक मालासोबत अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूही विकत आहेत. यामुळे दुकानदारांचा माल पडून राहून किरकोळ विक्रेते उद्ध्वस्त होतील.
ऑनलाईन कंपन्यांना अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यास दिल्यामुळे राज्यभरातील दुकानदारांमध्ये नाराजी आहे. राज्यातील दुकानदारांनी कोट्यवधी रुपयांचा माल खरेदी केला आहे. तो माल अद्यापही पडून आहे. या स्थितीत जोपर्यंत दुकाने सुरू होत नाहीत तोपर्यंत ऑनलाईन कंपन्यांना सवलत देऊ नये, असेही ते म्हणाले.