मुंबई : अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून बालकांची विक्री करणारे बोगस डॉक्टर व एजंट सह पाच जणांच्या टोळीचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे याच प्रकरणात अटक करण्यात आलेली ज्युलीओ फर्नाडीस विरोधातील हा सातवा गुन्हा आहे.
ट्रॉम्बे पोलीसांना बालकांच्या जन्माबाबत किंवा दत्तक देण्याबाबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न देता, खाजगी व्यक्तीकडून पाच लाखांत बाळ स्वीकारून ते अन्य महिलेच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक शरद नाणेकर यांच्या नेतृत्वखाली पथक तयार करून सापळा रचून दोन महिलांना नवजात बालकासह ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करत, एजंट महिला गोरीबी उस्मान शेख, शबाना झाकीर शेख, गुलाबशा मतीन शेख, ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस, सायराबानो नबीउल्ला शेख व रिना नितीन चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सायराबानो नबीउल्ला शेख ही डॉकटर म्हणून नर्सिंग होम मध्ये कार्यरत होती. ती बोगस डॉकटर असल्याचे तपासात समोर आले. तर, ज्युलीओ लॉरेन्स फर्नांडीस ही सराईत गुन्हेगार असून हा तिच्या विरोधातील सातवा गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले आहे.