शहरात फटाके विक्रीस मनाई, सार्वजनिक ठिकाणी १४ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 07:54 AM2022-10-20T07:54:02+5:302022-10-20T07:55:24+5:30
वाचा कोणत्या ठिकाणी फटाके फोडण्यास असेल बंदी.
मुंबई : मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फटाके विक्रीसह फटाके जवळ बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील अभियान शाखेचे उपायुक्त संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. १४ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू राहतील.
दिवाळीत नागरिक मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत असल्याने अन्य नागरिकांना होणारा अडथळा, गैरसोय, धोका किंवा अन्य प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फटाक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत.
आयुक्तांनी नियुक्त केलेल्या किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगी, परवान्याशिवाय कोणत्याही प्रकारचे फटाके विकणे, बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे, वाहतूक करणे यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनीही या आदेश व सूचनांचे पालन करून कोणालाही त्रास न होता आनंदाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या ठिकाणी फटाके वाजविण्यास मनाई
या कालावधीत ५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनसोबतच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट बफर झोन, माहूल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लि. बाॅडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या १५ आणि ५० एकर क्षेत्र अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके, राॅकेट्स उडवू किंवा फेकू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.