शाळेच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या पान टपऱ्या बंद होणार; राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 01:34 PM2024-02-14T13:34:06+5:302024-02-14T13:35:49+5:30
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सुरू केली आहे.
मुंबई- गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आता शाळेच्या आवारात असणाऱ्या पानटपऱ्यांबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शाळेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पान टपऱ्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
एक दिवस भाजपा मलाही प्रवेश द्यायचा विचार करेल; अशोक चव्हाणांवरून महुआ मोईत्रांची खोचक टीका
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आधीपासूनच विभागाने कारवाई सुरू केली आहे. आता अन्न व औषध प्रशासनाला कामाचे टारगेट दिले आहे. राज्यात पनीर, तेल, औषधांमध्ये सुरु असलेल्या गैरकारभारावर कारवाई सुरू केली आहे. तसेच राज्यातील पानटपऱ्यांवरही कारवाई झाली आहे. तसेच शालेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पानटपऱ्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असंही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
"१४ विभागाने एकत्र येऊन राज्यात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एन्टीबॉयोटीकमध्ये बनावट औषधे बनवल्याचे समोर आले आहे, यावरही कारवाई केली आहे. आम्ही एक बील पास केलं आहे ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेलं आहे, तो कायदा झाला तर आपण आरोपींवर मोठी कारवाई करु शकतो, तसेच आता इथून पुढे ही कारवाई सुरू राहणार आहे. राज्यात गुटखा बंदी पूर्णपणे करायची आहे. यासाठी मी काम करत आहे, असंही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
गेल्या काही दिवसापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाने गोंदियामध्ये मोठी कारवाई केली होती. बंदी असताना अवैधरीत्या दुकानात साठवून ठेवलेला १३६.७०२ किलो सुगंधित तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाने धाड घालून जप्त केला. देवरी येथील दुर्गा चौक बाजार लाइनमधील विशाल किराणा दुकान येथे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या तंबाखू साठ्याची किंमत एक लाख २७ हजार ६७५ रुपये आहे, तर भिवंडी शहरातून गुटख्याचा साठा जप्त केला होता. भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.